आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना भरपाई; पण श्रेय घेण्याची नेत्यांत स्पर्धा:कन्नड तालुक्यातील आजी-माजी आमदारांमध्ये नवा वाद

संतोष निकम | कन्नड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील ९० हजार ७४३ शेतकऱ्यांना अतिवृष्टी व सतत पावसाच्या नुकसान भरपाईपोटी ८९ कोटी ७३ लाख २१ हजार २०० रुपयांचा निधी प्राप्त झाला. लगेच आमदार उदयसिंह राजपूत, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात सोशल मीडियावर श्रेयवादाची लढाई सुरू झाली.

या निमित्ताने कन्नड तालुक्यातील जनतेला राजकीय मनोरंजनाचा नवा पट पाहण्यास मिळत असल्याची भावना आहे. हर्षवर्धन जाधव व उदयसिंह राजपूत यांचे कार्यकर्ते समाजमाध्यमावर आपापल्या नेत्याची चित्रफीत टाकत आहेत. कृषी सचिवाला दिलेले निवेदन, रुमणे मोर्चामुळेच झटक्यात ९० कोटी आणल्याचा दावा करताहेत. आमदार राजपूत आपल्या अडीच वर्षांत जो निधी मिळाला तो दहा वर्षांत मिळाला नाही, अशा चित्रफिती व्हायरल करून निधीचे श्रेय आपले असल्याचे सांगताहेत. महसूल, कृषी विभाग, पंचायत समिती अधिकाऱ्यांनी मात्र मौन पाळले आहे. तालुक्यातील बहुतांश रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून अक्षरश: चाळण झाली आहे. जेहूर-औराळा रस्त्याची तब्बल ४० वर्षांत एकदाही साधी डागडुजीदेखील झालेली नाही. कन्नड-चिकलठाण या रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. याचे उत्तर आजी-माजी कुणाकडेही नाही. या श्रेयवादासंदर्भात माजी आमदार नितीन पाटील यांना विचारले असता त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला.

रेकाॅर्ड, जोडपत्र अन् वस्तरा मी वचन देऊन सांगतो त्यांचे (माजी आमदार जाधव) मागील दहा वर्षांचे रेकॉर्ड काढा आणि माझे अडीच वर्षांचे रेकॉर्ड काढा, मग सर्व कळून जाईल, असे आमदार राजपूत म्हणाले. तर जाधव म्हणाले की, आमदारांना (राजपूत) जोडपत्र दोन म्हणजे काय ते कळत नाही. लोक लवकरच चूक दुरुस्त करून तुमच्या हातात वस्तरा देतील.

बातम्या आणखी आहेत...