आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे आंदोलन:सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, सेनगावात भाजपचे शक्तीप्रदर्शन, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

हिंगोली2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

वीज कंपनीकडून सक्तीने वीज बिल वसुली थांबवावी, तसेच वीज पुरवठा खंडित करू नये यासह इतर मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी ता. 20 सेनगाव येथे मोर्चा काढण्यात आला. मात्र डोक्यावर टोपी घालून शक्तिप्रदर्शन करणाऱ्या भाजपचे नेते व कार्यकर्त्यांना कोरोनाचा मात्र विसर पडल्याचे चित्र दिसून आले. सेनगाव तालुक्यातील 132 केव्ही उपकेंद्रातून विदर्भात जाणारा वीजपुरवठा तातडीने बंद करावा, नव्याने मंजूर झालेली 33 केव्ही उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करावे, कोळसा येथील वीज केंद्रामध्ये वाढीव क्षमतेचे ट्रांसफार्मर बसवावे, सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी यासह इतर मागण्यांसाठी सेनगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेनगाव येथे महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या विरोधात भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, रामराव वडकुते, गजानन घुगे, भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष पप्पु चव्हाण, मिलिंद यंबल, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नारायण खेडकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेनगाव शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या यामोर्चात भाजपचे पदाधिकारी फेटे व टोप्या घालून सहभागी झाले होते.

सदर मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वीज कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान या मोर्चामध्ये भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली. जीप मधून जनतेला हात उंचावून दाखवणारे नेते आणि पाठीमागे शेकडो कार्यकर्ते यांना मास्क वापरण्याचे भानही राहिले नसल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे हा मोर्चा होता का शक्तिप्रदर्शन याची चर्चाही आता सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...