आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानायलॉन मांजा वापराविरोधात शाळा, महाविद्यालय तसेच समाजाच्या विविध घटकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमांद्वारे प्रबोधन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. औरंगाबाद जिल्ह्यात एका वर्षात मांजाविराेधात ५७ गुन्हे नोंद केल्याची माहिती दिल्यानंतर एवढे गुन्हे तर एका दिवसात दाखल व्हायला हवे, असे खंडपीठ म्हणाले. खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील बारा जिल्ह्यांमध्ये मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी मांजाविरोधात अभियान राबवण्याचे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी दिले. जानेवारीपर्यंत नायलॉन मांजासंबंधी खंडपीठ सातत्याने सुनावणी घेईल असेही स्पष्ट केले.
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातामुळे एखाद्याचे कुटुंब रस्त्यावर येते. त्यामुळे मनपा, पोलिस विभागाने शाळा महाविद्यालयात पोस्टर्सद्वारे प्रबोधन करावे. प्राध्यापक आणि शिक्षकांनी एक मिनिट विद्यार्थ्यांना पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये असे मार्गदर्शन करावे. पोलिसांनी आपला लोगो असलेले पोस्टर्स महाविद्यालये आणि शाळांच्या परिसरात चिकटवावे.
नायलॉन मांजा वापराचे दुष्परिणाम सांगावे. विविध एनजीआंना यात सहभागी करून घ्यावे. शॉप ओनर्स असोसिएशन, ट्रान्सपोर्ट आणि ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांनाही प्रतिवादी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी वर्षभरातील गुन्हे ५७ आणि जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान नाेंदवल्याचे नमूद करत डिसेंबर महिन्यात गुन्हे जास्त दाखल होत असल्याचे सांगितले. याचिकेत विद्यापीठाच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे हजर झाले.
मांजामुळे विद्यापीठातील स्पर्धेत खेळाडू जखमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या विविध खेळांच्या स्पर्धेत नायलॉन मांजामुळे खेळाडू जखमी झाल्याचे न्यायालयाचे मित्र अॅड. सत्यजित बोरा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. खंडपीठात दाखल सुमोटो याचिकेच्या सुनावणीत कारवाईबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.