आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळी उत्सवाबद्दल पहिल्यांदाच संभ्रमाचे वातावरण असले तरी शहरात हाेलिकादहन ६ मार्च तर धूलिवंदन ७ मार्च साजरे राेजी हाेणार अाहे. देशातील १३ राज्यांत सूर्यास्त ६ वाजून ९ मिनिटांनंतर होणार असल्याने या ठिकाणी ६ मार्चला होलिकादहन केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर-पश्चिमी मध्य प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांचा समावेश आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर-पूर्व छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा आणि आसाम या ७ राज्यांत ६ वाजून ९ मिनिटांपूर्वीच सूर्यास्त होणार अाहे. त्यामुळे या राज्यांत ७ मार्चला होलिकादहन करता येणार आहे. होळीदहनाच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन उत्सव होईल. महाराष्ट्रात मात्र होळी ६ मार्चलाच साजरी करावी, असे पंचांग तज्ज्ञांनी सांगितले. शहरात सायंकाळी ५ वाजून ३ मिनिटांपासून ६ वाजून ३२ मिनिटांपर्यंतचा अमृत मुहूर्त आहे. ६ वाजून ३२ मिनिटे ते ८ वाजून ३ मिनिटे या चर मुहूर्तात होलिकादहन करणे शुभ आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
रंग खेळताना काळजी घ्या; वीज तारांपासून दूर हाेळी पेटवा
होळी व धूलिवंदन हा वसंत ऋतूचा स्वागतोत्सव आहे. होळी पेटवताना व रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी आणि सणाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
होळी पेटवताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी. जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील.
होळीसाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या. त्याचप्रमाणे धुळवडीस रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यांपर्यंत उडणार नाहीत याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकू नका. रंग उडवताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाहीत याची खबरदारी घ्या. रंग खेळताना ओल्या शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा धोका संभवतो. घरात रंग खेळताना वीज मीटर, प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा. ओल्या हाताने विजेच्या बटणांना स्पर्श करू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.