आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब कारभार:निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीस पॉझिटिव्ह असल्याचा फोन केल्याने पुंडलिकनगर आरोग्य केंद्रावर उडाला गोंधळ

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य अधिकारी म्हणाले, कामाचा व्याप असल्याने चुकून फोन गेला; काही काळ झाला तणाव निर्माण

सिडको एन- ४ भागातील स्वप्निल जगन्नाथ मगर (३०) यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असताना पुंडलिकनगर व जयभवानीनगर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पॉझिटिव्ह असल्याचा फोन केल्याने माेठा मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. मगर यांच्या नातेवाइकांनी पुंडलिकनगर आरोग्य केंद्रावर जाब विचारत रिपोर्ट निगेटिव्ह असूनही पॉझिटिव्ह असल्याचा फोन का केला, असे म्हणत वाद घातला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर आरोग्य अधिकाऱ्यांनी कामाचा व्याप जास्त असल्याने चुकून कर्मचाऱ्यांकडून कॉल गेल्याचे मान्य केले.

शनिवारी मगर यांच्या कंपनीकडून कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र मागवण्यात अाले होते. त्यामुळे त्यांनी तपासणी करून घेतली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा मेसेज अाला. तसे प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, रविवारी जयभवानीनगर व पुंडलिकनगर आरोग्य केंद्रावरून त्यांना पॉझिटिव्ह असल्याचा फाेन अाला. त्यामुळे मगर यांच्या कुटुंबीयांनी थेट पुंडलिकनगर आरोग्य केंद्र गाठले. माझा अहवाल निगेटिव्ह असतानासुद्धा तुम्ही वारंवार फोन का करता, असा जाब विचारल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. त्यांच्या नातेवाइकांनी थेट आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा धनवाले यांच्याशी फोनवर संपर्क साधत जाब विचारला. डॉ. धनवाले यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पुंडलिकनगर आरोग्य केंद्रावर नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य कर्मचारी विविध भागांत फिरून सर्वेक्षण करीत आहेत.
पुंडलिकनगर आरोग्य केंद्रावर नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य कर्मचारी विविध भागांत फिरून सर्वेक्षण करीत आहेत.

कशी आहे कामाची पद्धत
एखाद्या व्यक्तीने कोरोनाची तपासणी केल्यानंतर त्याच्या फोनवर मेसेज जातो. तसेच त्याच्या भागातील आरोग्य केंद्रावर यादी पाठवली जाते. त्यानुसार पत्ता तपासण्यासाठी फोन केला जातो. ती व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असल्याचे त्याला फोनद्वारे कळवले जाते. आरोग्य केंद्रात दोन रजिस्टर असतात. त्यात प्राथमिक माहितीच्या एका रजिस्टरवर सर्वांची नावे असतात. तर, दुसऱ्या रजिस्टरवर पॉझिटिव्हची नोंद होते. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीला स्वतः आरोग्य अधिकारी फोन करून माहिती सर्व देतात.

लहान अक्षर असल्याने घोळ
आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाइलवर पीडीएफ फाइल पाठवली जाते. ते पाहून फोन करतात. अनेक नागरिक योग्य पत्ता देत नाहीत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. मोठ्या प्रमाणावर अहवाल येतात. तसेच अक्षर लहान असल्याने, खासगी दवाखान्यातील अहवालावर लाल अक्षराने अधोरेखित केले नसल्याने अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका परिचारिकेने दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

भविष्यात अशा चुका होणार नाहीत
डॉ. धनवाले म्हणाल्या, आमच्याकडे दररोज मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट येत आहेत. त्याची एका कच्च्या रजिस्टरवर नोंद करण्यात येते. फोन करून रुग्णाच्या घरचा पत्ता विचारला जाताे. जोपर्यंत माझ्याजवळ पॉझिटिव्हचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही त्याची रजिस्टरवर नोंद घेत नाही. मी स्वतः संबंधित व्यक्तीला पॉझिटिव्ह असल्याचे फोन करते. जे फोन केले ते दोन केंद्रावरून गेले. कामाचा व्याप जास्त असल्यामुळे अशी घटना घडली असेल. भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. नागरिकांनीसुद्धा सामंजस्याने वागावे.

बातम्या आणखी आहेत...