आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या नेतृत्वात १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जोखडातून स्वतंत्र झाला. पण १७ सप्टेंबर हा दिवस मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यासाठी काँग्रेसने कधीच पुढाकार घेतला नाही. सोहळ्यांचे आयोजन केले नाही. उलट त्याकडे दुर्लक्षच केले. पण आता मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष धूमधडाक्यात साजरे करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. त्यात मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील स्वातंत्र्ययोद्ध्यां च्या मुलांचा सत्कार आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. या आयोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात समिती स्थापन होणार आहे. ठाणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय झाला. भाजपने हैदराबाद मुक्तिसंग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवली. कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निधी दिला नाही, असा आरोपही बैठकीत झाला. मात्र, बदलत्या राजकारणात उद्धव सेनेसोबत आगामी विधानसभा लढावी लागणार आहे. तेव्हा हिंदुत्ववादी मते काही प्रमाणात आपल्याकडे वळावी, या उद्देशाने काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३च्या अर्थसंकल्पात ७५ कोटींची घोषणा केली. त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन झाली होती. पण त्यानंतर ते सरकार पडले. शिंदे-फडणवीस सरकारने संदिपान भुमरेंच्या अध्यक्षतेखाली नवी समिती नेमली. पण एक रुपयाही निधी दिला नाही. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यावर अशोक चव्हाण यांनी अधिवेशनात आवाज उठवला. तेव्हा फडणवीसांनी निधी देऊ, असे आश्वासन दिले.
तालुकानिहाय व्याख्याने, सत्कार : काँग्रेसच्या सोहळ्यात मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. मराठवाडा मुक्तीसाठी काँगर्ेसने कशी लढाई लढली, याची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, भाजपतर्फे मुक्तिसंग्राम सोहळा नियोजनाची जबाबदारी असलेले किशोर शितोळे म्हणाले की, सप्टेंबरपर्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. ग्राउंड पातळीवर काय सुरू आहे याची त्यांना माहिती नसल्यामुळे काँग्रेस केवळ आरोप करत आहे.
युती शासनाच्या काळातच मराठवाड्यातील जिल्ह्याच्या शहरात स्तंभ उभारले गेले. आगामी विधानसभा उद्धवसेनेसोबत लढताना काही हिंदुत्ववादी मते मिळावीत, असा काँग्रेसच्या नेत्यांचा हेतू दिसतो. कारण आतापर्यंत काँग्रेसने कधीच उत्साहाने मुक्तिसंग्राम दिन साजरा केला नाही. अर्थात राजकारणासाठी का होईना काँग्रेसचे मुक्तिसंग्रामात सक्रिय होणे चांगले आहे. पण काँग्रेसने या निमित्ताने काही ठोस मराठवाड्याला मिळवून द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचे सचिव, राजकीय घडामोडींचे अभ्यासक सारंग टाकळकर यांनी सांगितले.
सोमवारी ठाण्यातील राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदियांनी मुक्तिसंग्राम सोहळा काँग्रेसतर्फे धूमधडाक्यात साजरा करण्याचा ठराव मांडला. तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्याने मंजूरही झाला. भाजपप्रणीत राज्य सरकार मुक्तिसंग्रामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.