आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकविमा कंपन्यांकडून लूट:काँग्रेसकडून रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा; शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास देखील नुकसान भरपाई देत नाहीत. त्यामुळे एकीकडे निसर्गामुळे झालेले नुकसान आणि त्यानंतर सुलतानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हास्तरावर आणि तालुका पातळीवर सर्वत्र पीक विम्याचे बाबतीत शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी गुरुवारी गांधी भवनमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात शेतकऱ्यांना यावर्षी अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाकडून अतिवृष्टीचे नुकसानीच्या भरपाईमध्ये सातत्याने घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे.

पीकविम्याची तक्रार

कल्याण काळे यांनी सांगितले की, राज्यभरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पातळीवर तसेच तालुक्यामध्ये देखील शेतकऱ्यांकडून पीक विम्याची बाबतीमध्ये फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. हे सर्व फॉर्म राज्यपातळीवर गोळा करण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही त्या कंपनीकडे देखील याबाबत तक्रार करण्यात येणार आहे.

असा आहे फॉर्म

काँग्रेसच्या वतीने पिक विमा नमुना अर्ज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कोणताही लाभ मिळालेला नाही, अशी माहिती फॉर्ममध्ये भरून द्यायची आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, गावाचे नाव, शेतीचे क्षेत्रफळ, ज्या पिकांसाठी विमा उतरवला आहे त्या पिकाचे नाव, विमा कंपनीचे नाव, मोबाईल क्रमांक आणि विमा पावतीची झेरॉक्स सोबत जोडायची आहे.

वीज कनेक्शन कापू नका

काळे म्हणाले की रब्बी हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. शेतकऱ्यांना पाणी देण्याची वेळ असताना वीज उपलब्ध नाही. एकीकडे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि विहिरीत पाणी असताना देखील शेतकऱ्याला ते पिकाला देता येत नसल्यामुळे होणारे नुकसान या दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम नाही थांबवल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष युसुफ शेख काँग्रेस प्रवक्ते पवन डोंगरे, जगन्नाथ काळे, अतिश पितळे,अनिस पटेल काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...