आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवशक्ती-भीमशक्ती एकीच्या प्रयोगात फक्त उद्धवसेना व वंचित बहुजन आघाडी एकत्र येेणार की काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाआघाडीत चौथा पक्ष सामील होणार हे निर्णायक ठरले आहे. स्वत:च्या नेत्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीची भाजपसोबत सेटलमेंट असल्याचा आरोप त्यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना केला.
प्रश्न : एकत्र लढतीचा प्रस्ताव आपण उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्यावर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यातील कुणा नेत्याने आपल्याशी संपर्क केला का?
आंबेडकर : नाही आणि करणारही नाहीत कदाचित. कारण त्यांना आपल्या नेेत्यांना जेलमध्ये जाण्यापासून वाचवायचे आहे. त्यांचा प्रत्येक नेता चौकशीच्या रडारवर आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत गेल्यावर त्यांच्या अडचणी वाढतील याची त्यांना धास्ती वाटत असावी. आम्हाला ती भीती नाही. आमच्यापैकी कुणाचीही चौकशी चाललेली नाही. त्यांना पक्षाचे नेते जेलमध्ये जाण्याची भीती अधिक वाटते.
प्रश्न : २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका ‘एकला चलो रे’ची होती, २०२२ मध्ये ती का बदलली?
आंबेडकर : आमची भूमिका बदललेली नाही. तेव्हाही आमची भूमिका धर्मनिरपेेक्ष विचारसरणीच्या बाजूने होती आणि आताही तीच आहे. मात्र याच कारणांमुळे काँग्रेस - राष्ट्रवादी आम्हाला घ्यायला तेव्हा तयार नव्हते.
प्रश्न : त्या वेेळी तुमची भुजबळांसोबत एक बैठकही झाली होती...
आंबेडकर : पण निर्णय झाला नाही ना. केवळ बैठका होऊन काय उपयोग? नुसत्या बैठकांची काय भाजी करून खायची आहे? मागील वेेळीही आम्ही हात पुढे केला होता. काँग्रेस - राष्ट्रवादीने भूमिका घेतली नाही. आमच्यासोबत यायचं नाही आणि आम्हाला सोबत घ्यायचं नाही हाच त्या वेळी त्यांचा निर्णय होता.
प्रश्न : तर या वेेळी तरी काय वेगळं होणार?
आंबेडकर : आम्ही दोन्ही प्रस्ताव पुढे ठेवले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत किंवा महाविकास आघाडीतील चौथा घटक म्हणूनही. मात्र, त्याबाबत “सकारात्मक’ या शब्दाने मिळणारा प्रतिसाद निरर्थक आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी निर्णय होणे गरजेचे आहे. तत्पूर्वीचा हा गोल्डन काळ वाया चालला आहे. त्यांना सोबत यायचं किंवा घ्यायचं नाही हेच यातून स्पष्ट होत आहे.
प्रश्न : ‘वंचित’मुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १२ खासदारांना आणि ३२ आमदारांना फटका बसला..
आंबेडकर : आमचेही ४ उमेदवार त्यांनी पाडले. मागील वेळी आम्हाला ४३ लाख मते मिळाली. सेनेनेही तेवढीच घेतली. त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत आले किंवा नाही आले तरी भाजपला हरवण्याची ताकद उद्धव ठाकरेंची शिवसेना व वंचित बहुजन आघाडीत निश्चित आहे. उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यायला शिकले पाहिजे.
प्रश्न : महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेतलं नाही तर त्यास कोण जबाबदार असेल?
आंबेडकर : मला व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही. मात्र, दिल्लीत “आप’ने भाजपला रोखले त्याप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करणे शक्य आहे. मात्र, आपल्या नेेत्यांना जेल होऊ नये, चौकशांपासून संरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत सेटलमेेंट सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.