आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी समीकरणे, नवे पेच:सेनेत दम राहिला नाही; काँग्रेस-राष्ट्रवादीने एमआयएमशी युती करावी : खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा घटक ठरलेल्या एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला राजकीय आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. “शिवसेनेत पूर्वीसारखा दम राहिला नाही. त्यामुळे ते भाजपला रोखू शकत नाही. म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमसोबत आघाडी करावी,’ अशी ही ऑफर आहे. दरम्यान, इतके दिवस भाजपची “बी टीम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयएमकडून अचानक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडे हा प्रस्ताव आल्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली अाहे. यामुळे विविध पक्षांत स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांसोबतच नवे पेचही निर्माण होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील तिन्ही पक्षांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या संदर्भात शनिवारी दिव्य मराठी प्रतिनिधीशी बोलताना इम्तियाज म्हणाले की, भाजप देशासाठी घातक आहे. उत्तर प्रदेशात धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनामुळे भाजप पुन्हा सत्तेत आला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमसोबत आघाडी करावी असा प्रस्ताव मी आरोग्य मंत्र्यांपुढे मांडला आहे. शिवाय भाजप विजयी झाला की काही पक्षांचे वैफल्यग्रस्त नेते त्याचे खापर एमआयएमवर फोडतात. एमआयएम म्हणजे भाजपची ‘बी’ टीम आहे, असेही हिणवतात. त्यामुळे आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला उघड ऑफर दिली आहे.

खा. इम्तियाज यांची राजेश टोपेंशी चर्चा; शिवसेनेसाठी ही ऑफर नाहीच

खा. इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने १७ मार्च रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांच्या सांत्वनासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटले. त्यांच्यातील राजकीय चर्चेनंतर हा प्रस्ताव दिला.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका वाहिनीशी बोलताना एमआयएमच्या प्रस्तावावर थेट भाष्य न करता “आम्हाला कुठल्याच प्रकारचा कट्टरवाद मान्य नाही,’असे म्हटले आहे.काँग्रेस

राजीनामा देऊन ते पक्षात आले तर स्वागत : भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

इम्तियाज एमआयएम पक्षाचा राजीनामा देणार असतील तर त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यास हरकत नाही. आमच्या धोरणानुसार ते काम करणार असतील तर “साहेब’ त्यांना नक्की पक्षात घेतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, “राजकीय प्रश्नांवर कुणाला एकत्र काम करायचे असेल, समविचारी पक्षांना एकत्र यायचे असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे,’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली. या प्रस्तावामागे काही चाल आहे का याचा अभ्यास केला जाईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यांची तर भाजपशी छुपी युती : राऊत

औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन जे गुडघे टेकतात आणि औरंगजेब ज्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएमची ऑफर धुडकावली. उत्तर प्रदेश, बंगालमध्ये एमआयएमचे भाजपशी साटेलोटे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंध येऊच शकत नाही, असे राऊत म्हणाले.शिवसेना

आता शिवसेना काय करते ते पाहायचे! -

भाजप​​​​​​​ आता शिवसेना सत्तेकरता नेमकी काय करते हे पाहायचे आहे. तसेही शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरंेऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे. अजानची स्पर्धा वगैरे चालली आहे. त्याचा हा परिणाम आहे का ते पाहू, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोणी कितीही एकत्रित आले तरी जनता मोदीजींच्या पाठीशी असून ती भाजपलाच निवडून देईल, असे ते म्हणाले.

शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेत आहे. भाजपशी लढण्याएवढा दम शिवसेनेत राहिलेला नाही. शिवाय बाबरी पाडल्याचे समर्थन शिवसेनेचे मुख्यमंत्री करतात. मुंबई दंगल शिवसेनेने घडवली. त्यांच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीवाले जातात. मग आमचे वावडे कशासाठी? काँग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिमांचे मतदान हवे. परंतु, त्यांनी राज्यातून एकाही मुस्लिमाला खासदार म्हणून निवडून का आणले नाही? असा सवाल करत आमची ऑफर शिवसेनेला मुळीच नाही, असेही इम्तियाज म्हणाले.

इम्तियाज जलील यांनी महाआघाडीला दिलेल्या ऑफरबाबत कळाले. त्यांचा बोलवता धनी दुसरा कुणी नव्हे, भाजप आहे. - चंद्रकांत खैरे, माजी खासदार, शिवसेना.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे आम्हा गरिबांची रिक्षा आहे. त्यातच आम्हाला फिरू द्या. -अंबादास दानवे, आमदार, शिवसेना

मुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंनी रिक्षातच फिरावे... आम्हा गरिबांची ही रिक्षा, त्यातच फिरू द्या!

या रिक्षाला एमआयएमचे चाक लावले तर तिची कार होईल आणि ही रिक्षा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी लक्झरी कारऐवजी रिक्षातच फिरावे. - इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम

बातम्या आणखी आहेत...