आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. मराठवाड्यातही या सभा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सभेने महाविकास आघाडी मजबूत राहणार असल्याचा संदेश दिला आहे. मात्र, यानिमित्ताने विभागात कमकुवत झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सभांच्या माध्यमातून गर्दी जमवण्याची आणि क्षीण झालेल्या पक्षांची ताकद वाढवण्याची संधी मिळाली आहे.
महाविकास आघाडीच्या सभेच्या माध्यमातून ‘आम्ही किती एकत्र आहोत’ हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत आहेत. देवगिरीच्या किल्ल्याप्रमाणे आम्ही एकत्र आणि मजबूत असल्याचे दाखले दिले जात आहेत. या माध्यमातून तिन्ही पक्ष एकमेकांची न पडणारी मते मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंबई, ठाणे या शहरांनंतर शिवसेनेला मराठवाड्याने आधार दिला आहे. प्रस्थापित नेत्यांना शिवसेनेच्या साध्या कार्यकर्त्यांनी पराभूत केल्याचा इतिहास आहे.
मतपेढी ‘ट्रान्सफर’ची मविआमधील पक्षांना अपेक्षा
मुंबई मनपासह आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकमेकांची मतपेढी आपल्याकडे ट्रान्सफर व्हावी, या साठी प्रयत्न आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवरही ठरावीक वर्गाचा पक्ष म्हणून आरोप केला जातो. या मविआच्या निमित्ताने हिंदुत्वाची ‘व्होट बँक’ आपल्याकडे येईल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. परस्परांची मते निवडणुकीत ‘ट्रान्सफर’ होतील अशी गोळाबेरीज सर्वच पक्ष करत आहेत.
हिंदुत्व जपत शिवसेनेलाही हवीत अल्पसंख्याकांची मते
उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची मतपेढी जपत अल्पसंख्याकांची मते हवी आहेत. भाजपकडून ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याची टीका करण्यात आली. त्यामुळे दरवेळी सभेत आपण हिंदुत्व सोडले नाही हे ते सांगत आहेत. ‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व माझे नाही’ हे सांगताना महाराष्ट्रात हिंदुत्वाबाबत भाजप वरचढ होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्याच वेळी मुस्लिमांना विरोध नाही हे सांगतांना वेगवेगळी उदाहरणेदेेखील ते देत आहेत.
मालेगावच्या सभेत मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. उद्धव ठाकरे यांनीदेखील छत्रपती संभाजीनगरच्या सभेत ते सांगितले. त्याच वेळी छत्रपती संभाजीनगरच्या सभेतदेखील त्यांनी ‘किती मुस्लिम आले आहेत?’ असे विचारत मुस्लिम समाजाची मते मिळावीत यासाठी एक प्रकारे पेरणी केली जात असल्याचे पाहायला मिळाले. मुस्लिम समाजाचा भाजपला तीव्र विरोध आहे. त्यामुळे भाजपच्या पराभवासाठी मुस्लिम मतदार शिवसेनेकडे पर्याय म्हणून पाहू शकतो, असा शिवसेनेतील नेत्यांचा कयास आहे.
मतपेढी मजबूत करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकेकाळी काँग्रेसचे सर्व सहा आमदार होते. मात्र, आता एकही आमदार नाही. गेल्या निवडणुकीत तर काँग्रेसला पश्चिम मतदारसंघात उमेदवार पुरस्कृत करावा लागला. ‘पूर्व’मध्ये समाजवादी पक्षाला ही जागा सोडावी लागली होती. जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल, परभणीत सुरेश वरपुडकर, नांदेडमध्ये अशोक चव्हाण, लातूरमध्ये अमित देशमुख हे नेते आहेत, पण पक्षाची ताकद बीड, धाराशिव जिल्ह्यात क्षीण होत आहे. हिंदू मतदार गेल्या काही वर्षांत दुरावला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या यानिमित्ताने काँग्रेसला पूर्वीप्रमाणे हिंदूची मते मिळावीत यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.