आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसतर्फे राज्यात अनेक ठिकाणी महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व फुलंब्रीचे आमदार कल्याण काळे व शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सिलिंडर दरवाढीचा निषेध करण्यासाठी आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिलिंडरचे अंत्यसंस्कार केले व चुली पेटवल्या.
मोर्चाची परवानगी न घेतली नाही!
दरम्यान, आज सकाळी काँग्रेसतर्फे क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महागाईविरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मोर्च्याला सुरूवात होताच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखले. या मोर्चासाठी आंदोलकांनी परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे. तर, पोलीस आयुकांनी जमाव बंदी लागू असल्यामुळे मोर्चा काढू नये, असे सांगितल्यामुळे मोर्चा काढला नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी सांगितले. त्यामुळे अखेर आंदोलनकर्त्यांनी शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.
महागाई कमी न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन - आमदार कल्याण काळे
वाढत्या महागाईमुळे देशभरातील गोरगरीब जनता भरडली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केले जात आहे. केंद्र सरकारने सामान्यांच्या अडचणीकडे लक्ष देऊन तातडीने महागाई कमी करावी. अन्यथा काँग्रेसतर्फे आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी आमदार कल्याण काळे यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.