आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील गावागावातील ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायट्या, बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना रसद पुरवून झुंजवणाऱ्या बहीण-भावाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, मागील दोन गाळप हंगामांतील उसाच्या एफआरपीचे सुमारे ५ कोटी पंधरा लाख रुपये कोण देणार, याबाबत पंकजा पालवे-मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी खुलासा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली. बहीण-भावाच्या साखर मैत्रीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
आपेट म्हणाले की, सन २०२०-२१ च्या गाळप हंगामात वैद्यनाथ कारखान्याने २,७४,००० टन उसाचे गाळप केले. प्रतिटन ११४ रुपयांप्रमाणे एफआरपी थकीत आहे. सुमारे ३ कोटी १२ लाख रुपयांची उसाची थकबाकी होती. तरीही सन २०२१-२२ मध्ये पंकजा पालवे-मुंडे यांनी विनापरवाना वैद्यनाथ साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू केला. या हंगामात ३,०२,००० टन उसाचे गाळप केले. पुन्हा शेतकऱ्यांचे प्रतिटन ६७ रुपये प्रतिटनाप्रमाणे सुमारे २ कोटी २ लाख रुपये दिले नाहीत.
वैद्यनाथ साखर कारखान्यावर आज सुमारे ४४८ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. तरीही बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२०-२१ च्या गाळपासाठी महाराष्ट्र सरकारच्या थकहमीवर १६.५० कोटींचे कर्ज दिले.
या कर्जाची कसलीही परतफेड वैद्यनाथ साखर कारखान्याने केलेली नाही. कारखान्याने सुरुवातीपासून मांजरा, रेणा, नॅचरल अशा शेजारील जिल्ह्यांतील साखर कारखान्यापेक्षा सुमारे ४०० ते ५०० रुपये प्रतिटन कमी पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत.मुंडे बहीण-भावाची ‘साखर’मैत्रीपरळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील उसाचे गाळप पंकजा पालवे-मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावाच्या मालकीच्या वैद्यनाथ, पन्नगेश्वर आणि व्यंकटेश्वरा या साखर कारखान्यांत केले जाते.
या तिन्ही साखर कारखान्यांत शेतकऱ्यांचे उसाच्या एफआरपीचे पैसे कायद्याप्रमाणे १५ दिवसांत दिले जात नाहीत. ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी, बाजार समिती निवडणुकीत गावपातळीवरील कार्यकर्त्यांना रसद पुरवून झुंजवणारे बहीण-भाऊ वैद्यनाथ साखर कारखाना, जगमित्र सूतगिरणी, वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत एकमेकांना सांभाळून घेत आहेत. बहीण-भावाच्या साखर मैत्रीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे आता तरी शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आपेट यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.