आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी टॉक शो:जी-20 च्या संधीचे सोने करण्यासाठी या सूचनांचा विचार करा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यानिमित्ताने पर्यटन विकासापासून पायाभूत सुविधांपर्यंत, शहराच्या चेहऱ्यापासून सकारात्मक ब्रँडिंगपर्यंत कायापालट करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील उद्योग, बांधकाम, पर्यटन, पर्यावरण व पुरातन वारसा संवर्धन, हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी, टूर्स अँड ट्रॅव्हल्स या सर्व क्षेत्रातील मान्यवर संस्थांनी मांडलेल्या या सूचना. विशेष म्हणजे या साऱ्यांची अंमलबजावणी करण्याची धुरा ज्यांच्या शिरावर आहे त्या स्मार्ट सिटीचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी याची नोंद घेत जी-२० च्या अनुषंगाने प्रशासनाच्या पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजना मांडल्या.

दिव्य मराठीच्या माध्यमातून औरंगाबादकरांनी प्रशासनास केल्या विविध सूचना
बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किटमध्ये औरंगाबादचा सहभाग मिळवा.
कलाग्रामचे नूतनीकरण व्हावे.
शहर अवैध होर्डिंगपासून मुक्त व्हावे, हॉकर्स झोन ठरवावेत.
शासकीय कार्यालय बंद झाल्यावर त्या ठिकाणी पे अँड पार्क उभारावे.
वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण देशभरातील उद्योगांच्या प्रायोजकत्वातून करा.
नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवावे.
रिक्षा व टॅक्सीचालकांचे प्रबोधन व्हावे, पर्यटकांसाठी बस सुरू व्हावी.
ऑरिक सिटीला पाहुण्यांची भेट व्हावी व उद्योजकांशी संवाद व्हावा.
शहराचा सांस्कृतिक वारसा सादर करण्यात यावा.

नागरिकांना सहभागी करून घेणार
सिटी ब्रँडिंगसाठी समिती स्थापन केली आहे. लोकसहभागातून प्रबोधन व स्वच्छता अभियान राबवले जाईल. वाहतूक बेट, झेब्रा क्रॉसिंग, रोड लायनिंगचे काम सुरू झाले आहे. अवैध होर्डिंग्ज काढण्यासाठी मोहीम राबवण्यात येईल. मनपा पोर्टलवर नागरिकांनी सूचना कळवाव्यात. सीएसआर उपलब्ध झाल्यास अनेक कामे पूर्ण होतील. - सौरभ जोशी, अतिरिक्त आयुक्त,स्मार्ट सिटी

सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा गरजेचा
औरंगाबादसाठी ही परिषद सुवर्णसंधी आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आवश्यक आहे. विमानतळ, बसस्थानक, रेल्वेस्टेशन यांचे सुशोभीकरण, तेथील रिक्षावाले, टॅक्सीचालक यांचे समुपदेशन, सायंकाळी पार्किंगची व्यवस्था, रस्त्यावरील मांस विक्री, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण या साऱ्यात जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. - प्रशांत देशपांडे, अध्यक्ष, औरंगाबाद फर्स्ट

असा योग पहिल्यांदाच आला
इतिहासात पहिल्यांदाच आपल्या शहराला पाच मंत्री लाभले आहेत. त्यातच चांगले शासकीय अधिकारीही लाभले आहेत. शासकीय अधिकारी, मंत्री यांच्यात योग्य समन्वय साधून जी-२० सोबतच कायमस्वरूपी शहराचे स्वच्छ व शिस्तबद्ध नियोजन झाले तर शहराचा कायापालट होईल. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.
- रवी वट्टमवार, महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष, क्रेडाई

उद्योगांची ताकद दाखवण्याची संधी
मराठवाडा,औरंगाबादेत उद्योगवृद्धीसाठी खूप मोठी क्षमता आहे. फूड प्रोसेसिंग ते आयटीपर्यंत, ऑटोमाबाइल ते सेवा क्षेत्रापर्यंतची आपल्या उद्योगांची क्षमता व गुणवत्ता ाहुण्यांसमोर दाखवण्याची गरज आहे. त्यांच्यासोबत उद्योजकांचा संवाद व्हावा, त्यांची ऑरिकमध्ये भेट व्हावी, उद्योगांना आपले काम मांडण्यासाठी प्रदर्शनी मिळणे गरजेचे आहे.- नितीन गुप्ता, अध्यक्ष, सीएमआयए

व्हिजिटर्स सेंटर्स कार्यान्वित करा अजिंठा, वेरूळ हे औरंगाबादचे वैभव आहे. अजिंठ्याकडे जाणारा रस्ता अजूनही नीट झालेला नाही. या ठिकाणी असलेले व्ह्यू पाॅइंट्स, व्हिजिटर्स सेंटर्स यांची दुरवस्था झाली आहे. छोट्या व्यावसायिकांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स गरजेचे आहे. वाटेतील ग्रामपंचायतींच्या सहभागातून पाहुण्यांचे पारंपरिक स्वागत व्हावे. - पपिंद्रपाल सिंग खनुजा, अजिंठा वेल्फेअर असोसिएशन

महापालिकेत हेरिटेज सेल हवा
आपल्या शहराची प्रतिमा, ऐतिहासिक ओळख जपायला हवी. वारसा स्थळे ही आपली ताकद आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे दिशादर्शक फलक असावेत. त्यांच्याकडे जाणारे रस्ते स्वच्छ असावेत. पर्यटकांसाठी स्वतंत्र बसेस असाव्यात. पुणे -मुंबईप्रमाणे महापालिकेत हेरिटेज सेल असावा. संवर्धनाचे काम करणाऱ्यांचा सहभाग व सल्ला घ्यावा. - माया वैद्य, आर्किटेक्ट, प्रतिनिधी इंटॅक

संघटित प्रयत्न आवश्यक
रस्त्यावरील बांधकाम साहित्य, कचरा साफ होणे गरजेचे आहे. दुभाजकांवरील हिरवळ नव्याने फुलवणे, होर्डिंग्ज हटवणे, रस्त्यालगतच्या प्रत्येक शासकीय कंपाउंड वॉलची रंगरंगोटी करणे गरजेचे आहे. संपूर्ण शहराला एकत्र येऊन काम करावे लागेल. - अजय ठाकूर, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशन

जगात औरंगाबादला नेण्याची संधी
जी-२० च्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, संस्कृतीचे सकारात्मक चित्र जगभरात नेता येईल. आपल्याकडील क्षमता आणि उत्तम कनेक्टिव्हिटी त्यांच्या नजरेत भरवता आली पाहिजे. एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनसमोर रिक्षा व ट‌ॅक्सीचालकांच्या ओंगळवाण्या वर्तनाचे दृश्य बदलले पाहिजे. -अर्पित सावे, सचिव, सीएमआयए

जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा
जी-२० परिषद ही औरंगाबादची प्रतिमा जगभरात पसरवण्यासाठी मोठी संधी आहे. हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने प्रशासनाने काही शॉर्ट टर्म तर काही लाँग टर्म कामे हाती घेणे गरजेचे आहे. शहरावर प्रेम असणाऱ्या सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे.- राहुल मोगले, सचिव, मसिआ

भविष्यातही सुविधा कायम राहाव्यात
जी-२० परिषदेसाठी हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री पूर्ण तयार आहे. हा सोहळा सगळ्यांसाठी अविस्मरणीय व्हावा यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. यानिमित्ताने जी सुविधा आपण देणार आहोत ती भविष्यातही कायम राहावी.-हरप्रीत सिंग, अध्यक्ष, हॉटेल इंडस्ट्री असोसिएशन

सकारात्मक बाबींचे मार्केटिंग व्हावे
औरंगाबाद शहराच्या सकारात्मक बाबींची चर्चा करण्याची, ब्रँडिंग करण्याची, मार्केटिंग करण्याची जी-२० परिषद ही चांगली संधी आहे. एवढे वैविध्यपूर्ण औद्योगिक क्षेत्र व ताकद असलेले हे शहर आहे. या क्षमता व शक्यतांचे सकारात्मक मार्केटिंग यादरम्यान व्हायला हवे.-उत्सव माछर, सीएमआयए

बातम्या आणखी आहेत...