आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:दारू पिऊन अाईला सतत शिवीगाळ अन् मारहाण; संतप्त मुलाने बापाला संपवले

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. इन्सेट : मृत श्रीकिसन तागड. - Divya Marathi
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. इन्सेट : मृत श्रीकिसन तागड.
  • राग अनावर वडिलांवर हल्ला केल्याची बीड जिल्ह्यात आठवडाभरात दुसरी घटना
  • व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने ताण वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे निरीक्षण

दारू पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या वडिलांवर गोळीबार केल्याची घटना गत आठवड्यात आष्टीत घडली होती. असाच प्रकार सोमवारी रात्री बीड तालुक्यातील पिंपळनेरमध्ये घडला. आईला शिवीगाळ केल्याने मुलाने काेयत्याने वडिलांवर वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकिसन अंबादास तागड (६०) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे.

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीकिसन अंबादास तागड यांना दारूचे व्यसन होते. ते दारू पिऊन पत्नीला सतत शिवीगाळ, मारहाण करत असत. सोमवारीही सायंकाळी त्यांनी पत्नीशी वाद घातला, शिवीगाळ व मारहाण केली. वडील आईला शिवीगाळ व मारहाण करत असलेेेले पाहून मुलगा लहू (२२) मध्ये पडला. श्रीकिसन यांचा त्याच्याशीही वाद झाला. या प्रकारानंतर ते शेतात निघून गेले. दरम्यान, ते घरी परत येत नसल्याने लहू त्यांना शोधत शेतात गेला. तेथे पुन्हा बापलेकांत वाद झाला. या वेळी लहूने जवळच्या काेयत्याने श्रीकिसन यांच्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लहूविरोधात श्रीकिसन यांचे भाऊ राेहिदास तागड यांच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंेद करण्यात आला. पोलिसांनी लहूला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पिंपळनेर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

लॉकडाऊनमुळे बिघडले मानसिक स्वास्थ्य
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दीड वर्षापासून टप्प्याटप्प्याने मोठा लॉकडाऊन लावला जात आहे. सर्व प्रकारचे उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. छोटे व्यापारी, मजुरी करणारा वर्ग, दिवसभर काम केले तरच पोट भरू शकेल, अशा स्थितीत असलेल्या वर्गाचे यामुळे मोठे हाल झाले आहेत. या लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. विशेषत: गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांचा यामध्ये अधिक समावेश आहे. ज्यांना यापूर्वी मानसिक आरोग्याबाबतच्या कोणत्याही तक्रारी नव्हत्या, असे नवे रुग्ण वाढत आहेत हे विशेष. अनेक जण मानसिक स्वास्थ्य बिघडण्याच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचे जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सय्यद मुजाहेद म्हणाले.

काय आहे दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात कुटुंबाला अधिक त्रास सहन करावा लागतो.
व्यक्तीची चिडचिड बऱ्याच प्रमाणात वाढते, नैराश्य कुटुंबावर निघते.
कुटुंबाशी वाद, मारहाण, शिवीगाळ असे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढतेे.
महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो.

तिसरा टप्पा उद्रेकाचा
मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यक्तींचा तिसरा टप्पा हा सामूहिक उद्रेकाचा असतो. समजा लॉकडाऊन चालू राहिले आणि ते सहनशीलतेच्या पलीकडे गेले तर लोक रस्त्यावर येतील, कधी प्रशासन तर कधी सरकार यांच्या विरोधात ते रोष व्यक्त करतील. मास सायकॉलॉजी असेच सांगते. - डॉ. सय्यद मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ, बीड.

पिंपळनेर ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी झाला दुहेरी खून
पिंपळनेर ठाणे हद्दीत खुनाची आठवड्यात दुसरी घटना घडली. काही दिवसांपूर्वीच नागापूर येथे दुहेरी खून झाला होता. त्यानंतर पिंपळनेरमध्ये खून झाला. आता मुलाने बापाचा खून केल्याच्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...