आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत गाणे वाजवण्यावरून वाद:हातातील लाकडी दांडक्यांनी टोळक्याची दिसेल त्याला मारहाण, गाड्यांची तोडफोड

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाणे वाजवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान मोठ्या हल्ल्यात होऊन तणाव निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान धूत रुग्णालयासमोरील श्रद्धा कॉलनीत ही घटना घडली. एका गटातील तरुणांनी काही स्थानिकांना मारहाण करत वाहनांची तोडफोड केली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांचे लोक ठाण्यात ठिय्या देऊन होते. पोलिस त्यांची समजूत काढत होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कॉलनीमध्ये तरुणांच्या गटाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी जल्लोषात गाणे व नृत्य सुरू असताना तरुणांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाले. वाद वाढत गेला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता वाटल्याने पोलिसानी आयोजकांना गुरुवारी गाण्याचा कार्यक्रम स्थगित ठेवण्याच्या सूचना केल्या. आयोजकांनीही त्या पाळल्या. परंतु गुरुवारी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास तरुणांचा एक गट श्रद्धा कॉलनीत हल्ला करण्याच्या हेतूने घुसला. हातातील लाकडी दांडक्यांनी या तरुणांनी दिसेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर स्थानिकांच्या घरासमोर, रस्त्यावर उभ्या दुचाकी, चारचाकींची तोडफोड केली. त्यामुळे कॉलनीत तणाव निर्माण झाला होता. यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले होते. पोलिस वेळेत पोहोचल्याने तणाव निवळला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, ब्रह्मा गिरी, विठ्ठल पोटे मोठ्या फाैजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गट रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक पोलिसांकडे आग्रह धरत होते. पण रात्री उशिरापर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आली नव्हती. श्रद्धा कॉलनीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस जमावाची समजूत घालत होते.