आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकाचे पाऊल:कमी दराने मांस विक्रीवरून वाद; शेजारील विक्रेत्याच्या छातीमध्ये सुरा भोसकून हत्या

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी दराने मांस विक्री करण्यावरून मटण विक्रेत्यांत वाद होऊन एका विक्रेत्याच्या छातीत सुरा भाेसकून हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ९.३० वाजता पिसादेवी रस्त्यावर घडली. अश्फाक युसूफ शहा (३५, रा. मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे, अब्दुल ऊर्फ सलाम गुलाम रसूल, कलीम गुलाम रसूल कुरेशी, शाहिद गुलाम रसूल कुरेशी, रहीम गुलाम रसुल कुरेशी (सर्व रा. मिसारवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. यात सिडको पोलिसांनी तिघांना अटक केली.

मिसारवाडी परिसरात भाऊ, पत्नी, दोन मुलांसह अश्फाक राहत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. त्यांचे पिसादेवी रस्त्यावर मटण-चिकन विक्रीचे दुकान आहे. तेथे अन्य विक्रेत्यांचीदेखील दुकाने आहेत. मात्र, अश्फाक यांचा व्यवसाय चांगला चालत असल्याने आरोपी सलाम, कलीम यांना ते सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी खराब दर्जाचे मटण आणून कमी दराने विक्री सुरू केली. अश्फाक यांच्या दुकानासमोरच त्यांच्या कमी दराचे फलक लावत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी अश्फाक यांना दुकान दुसरीकडे हलवण्यासाठी धमकावले होते. अश्फाक व इतर विक्रेत्यांनी मात्र त्यांच्या कमी दराने मांस विक्री करण्यावर आक्षेप घेतला होता. तुमच्यामुळे सर्वांच्याच विक्रीवर परिणाम होत आहे, असा आक्षेप इतर विक्रेते घेत होते. मात्र, आरोपी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

आराेपी अश्फाक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून, मृत्यू झाल्याचे कळताच पळाले घटनेची माहिती कळताच सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सकाळी नऊ वाजता वार केल्यानंतर आरोपी अश्फाक यांच्या प्रकृतीची सातत्याने माहिती घेत हाेते. परंतु, अश्फाक यांचा घाटीत दुपारी तीन वाजता मृत्यू झाल्याचे कळताच मारेकरी साडेतीन वाजता जालन्याच्या दिशेने पळाले. अवचार यांना ही बाब कळताच पोलिस अंमलदार सुभाष शेवाळे, लालखान पठाण, प्रदीप दंडवते, श्याम काळे, शिवाजी भोसले यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. लाडगावजवळ ते रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसताच पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या.

एमजीएममधून घाटीत नेले, डाॅक्टरांकडून मृत घाेषित अश्फाक रविवारी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा आरोपी सलामने पुन्हा कमी दराचा फलक लावला. त्यावर अश्फाक यांनी आक्षेप घेत असे करू नका, असे समजून सांगितले. मात्र, सलामने वाद वाढवून भावांना बोलावून घेतले. त्यानंतर थेट मांस कापण्याचा सुरा छातीत दोन वेळेस भाेसकला. अश्फाक रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना आधी एमजीएममध्ये नेले. मात्र, तेथे त्यांना घाटीत नेण्यास सांगितले. घाटीत दुपारी तीन वाजता अश्फाक यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...