आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधक मात्र वंचित:दीक्षांत सोहळ्यात फक्त नेत्यांचाच गौरव; पदवी प्रदान न झाल्याने पीएचडी धारकांत नाराजी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत सोहळा १९ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपालांच्या हस्ते ‘डीलिट’ ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आले. दीक्षांत सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात का होईना संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान होईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी काही पीएचडीधारक कुटुंबीयांसह उपस्थित होते. फक्त पाहुण्यांचाच कौतुक सोहळा करून प्रशासनाने कार्यक्रम उरकला. संशोधकांपैकी एकालाही मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी देण्यात आली नाही. त्यामुळे यापैकी काही जणांनी ‘दिव्य मराठी’कडे नाराजी व्यक्त केली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाला नव्हता. या वेळी संकट सरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम साजरा होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अध्यक्षस्थानी होते, तर परम कॉम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याच समारंभात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही मानद पदवी देऊन सन्मान करण्यात आला. पीएचडी प्राप्त संशोधकांनी सांगितले की, या कार्यक्रमात संशोधकांचाही पाहुण्यांच्या हस्ते सन्मान होणार या आशेने खूप आनंद झाला होता. त्यासाठी ५६५ विद्यार्थ्यांनी यापूर्वीच प्रत्येकी ६५० रुपये शुल्कही भरून घेतले. ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाने त्यासाठी मुदतही दिली होती. त्यानुसार संशोधकांनी रजिस्ट्रेशन केले. संशोधकांना १७ व १८ नोव्हेंबर रोजी स्कार्फचे वाटप केले. तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी आधी पास घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करून घेतले होते. उपस्थित राहण्यासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान करण्याचा ड्रेसकोडही ठरवला होता. पाहुण्यांच्या हस्ते पदवी घ्यायची म्हणून अनेक जण बाहेरगावाहूनही आले होते. काहींनी कुटुंबीयांनाही सोबत आणले होते. मात्र कार्यक्रम संपेपर्यंत अनेकांना पदवी प्रदान होणार नाही याची कल्पना नव्हती. समारंभ झाला तरी गौरव न झाल्याने मात्र सर्वांची निराशा झाली. नंतर एका ठिकाणी स्वत:च पदवी घेऊन जाण्याची सोय केली होती.

इतक्या विद्यार्थ्यांना पदवी देणे कसे शक्य ? दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल असे काही सांगण्यात आलेले नव्हते. सामूहिकरीत्या पदवी प्रदान करण्यात येईल असेच ठरले होते. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असल्याने ते शक्यही नव्हते. तसे सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले होते. आता तर इतर विद्यापीठातील समारंभातही असाच पदवी प्रदान सोहळा केला जातो. -डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

समारंभ फक्त नेत्यांसाठीच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सोहळयात पदवी मिळावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते. यंदा तर दोन वर्षांच्या कोरोनाकाळानंतर प्रथमच हा समारंभ होत असल्याने आमच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पदवी घेण्यासाठी काही जण सहकुटुंब आले होते. यासाठी ६५० रुपये शुल्कही आकारले होते. राजकीय समारंभच झाला. विद्यार्थ्यांची मात्र निराशा झाली. डॉ. हनुमंत गुट्टे, संशोधक विद्यार्थी

बातम्या आणखी आहेत...