आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी, बारावी परीक्षा सुरु असून सोमवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. शुक्रवार दि. 3 मार्च रोजी बारावीच्या परीक्षेत एका केंद्रावर विद्यार्थी उत्तरपत्रिका घेवून पळून गेल्याच्या घटनेमुळे सोमवारी दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला कडक बंदोबस्त असेल, तपासणी केंद्रांवर होईल असे वाटले होते.परंतु शहरातील बहुतांशी केंद्रावर शिक्षण मंडळाचे भरारी पथक, बैठे पथक ही नव्हते.
शहरात कॉपीचे प्रकारांमध्ये सामसूम वातावरण असले तरी ग्रामीण भागात मात्र कॉपीची धामधुम कायम असल्याचे चित्र इंग्रजीच्या पेपलाही कायम होते. पैठणमधील एका केंद्रावर तर चक्क बाहेरुन गाईड फेकण्याचा प्रकार समोर आल्याचे खुद्द शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच सांगितले. याप्रकरणी पहिल्याच पेपरला गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. तर दहावीच्या परीक्षा 1 मार्च पासून सुरु झाल्या आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभागातून 1 लाख 69 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दहावीला 1 लाख 80 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सोमवार दि. 6 मार्च रोजी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. तर बारावीचा सहकार विषयाचा पेपर होता. परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजेपासून परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 10.30 वाजेनंतर प्रवेश न देण्याच्या सुचना असल्याने परीक्षा केंद्रांवर तशाप्रकारची व्यवस्था करण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षण मंडळाने भरारी पथके नेमली. तर महसूल विभागाचेही बैठे पथक असतील असे सांगण्यात आले होते. कॉपीमुक्त परीक्षेसाठी गाजावाजाही केला. परंतु शहरात अनेक केंद्रावर ना भरारी पथक, ना बैठी पथक फिरकले.
अनेक केंद्र प्रमुखांनी पथकांनी हजेरी लावली नसल्याचे सांगितले. मात्र, परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त चोख होता. शिक्षण मंडळाच्या सुचनेप्रमाणे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची एका बाकावर एक अशी बैठक व्यवस्था करण्यात आली. परीक्षा कक्षाबाहेर विद्यार्थ्यांच्या बॅगा ठेवण्यात आल्या होत्या. तर काही केंद्रावर एकाच ठिकाणी त्यासाठी व्यवस्था करण्यात आली. काही केंद्रावर विद्यार्थ्यांना पादत्राणे परीक्षा कक्षाबाहेर ठेवावी लागली. दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने परीक्षा, प्रश्नपत्रिका कशी असेल याबाबतची अनेक विद्यार्थ्यांना धाकधूक होती.
तर पेपर संपल्यावर मात्र आनंदाने चेहरा फुलेला घेवून विद्यार्थी केंद्राबाहेर आल्याचे चित्रही दिसून आले. मात्र शहरात ही स्थिती असली तरी ग्रामीण भागात मात्र कॉपीचे प्रकार सररास सुरु आहेत. काही केंद्रावर आतल्या आतच तोंडी उत्तरे सांगितली जात आहेत. तर पैठण तालुक्यात मात्र परीक्षा केंद्राबाहेर आजूबाजूच्यांचाच त्रास केंद्राला होतो आहे. बाहेरुन कॉप्या फेकल्याचे प्रकार समोर आल्याने पोलीसांना कळवण्यात आल्याचेही शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.