आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस दलातील चालक पदाच्या परीक्षेत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ स्टाइल हायटेक काॅपी करताना एका अल्पवयीन मुलीला व तरुणाला पोलिसांनी बुधवारी औरंगाबादेत रंगेहाथ पकडले. राहुल मदन राठोड (२३, रा. पारुंडी, पैठण), त्याचा सहकारी सतीश राठोड यांना अटक करण्यात आली. तर दुसऱ्या परीक्षा केंद्रावर डमी उमेदवार म्हणून आलेली अल्पवयीन मुलगी व मूळ उमेदवार पूजा रामदास दिवेकर यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीस नंतर साेडून दिले. सूत्रधार रणजित राजपूत (बहुरे) विरोधात गुन्हा दाखल झाला असून ताे फरार आहे.
औरंगाबादेतील या पदाच्या २४ जागांसाठी ३३६० उमेदवारांनी अर्ज केले हाेते. त्यांची बुधवारी लेखी परीक्षा झाली. शहरातील दहा केंद्रांवर सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत परीक्षा होती. चिकलठाण्यातील न्यू हायस्कूल केंद्रावर राहुल परीक्षा देत हाेता. केंद्रात गेल्यावर त्याने बाथरूममधील खिडकीतून मित्राकडून मोबाइल घेतला. त्याने आतून एक टी-शर्ट व वरून दुसरा साधा शर्ट परिधान केला हाेता. आतील शर्टच्या खिशात त्याने माेबाइल ठेवला व अगदी शेंगदाण्याएवढ्या आकाराचे इअरफाेन कानात घातले.
प्रश्नपत्रिकेचा फोटो काढण्यासाठी शर्टच्या बटणाजवळ ट्रान्समिटर लावले होते. परीक्षा सुरू होताच त्याच्या संशयास्पद हालचाली केंद्रातील सीसीटीव्हीत दिसल्या. त्यामुळे परीक्षकांनी राहुलची तपासणी केली असता त्याचे पितळ उघडे पडले. त्यानंतर पाेलिसांनी त्याचा साथीदार सतीश राठाेडलाही अटक केली. दुसरीकडे एमआयटी महाविद्यालयाच्या केंद्रावरही असाच प्रकार उघडकीस आला. प्रत्येक उमेदवाराला तपासणी करून आत साेडण्यात आले हाेते. तिथे एका मुलीला जन्मतारीख विचारण्यात आली. तिने सांगितलेली तारीख व आधार कार्डवरील तारीख चुकीची आढळली. त्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. तिचीही कसून चौकशी केली तेव्हा ती घाबरली.
महिला पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडेही राहुलप्रमाणेच मायक्रो डिव्हाइस, कानात ठेवायचे बारीक हेडफोन आढळले. विशेष म्हणजे ही मुलगी दुसऱ्याच्या नावावर डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्यास आली हाेती. तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. ती जिच्या नावावर परीक्षा देत हाेती त्या पूजा दिवेकरलाही ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन मुलीला मात्र कायद्यानुसार अटक करता आली नाही. उमेदवारांना अशा हायटेक काॅपीचे साहित्य पुरवणाऱ्या व पूर्ण मदत करणाऱ्या रणजितला सहा लाख रुपये दिल्याची प्राथमिक माहिती आहे. पाेलिस या मूळ सूत्रधाराचा शाेध घेत आहेत, असे पाेलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.