आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना अपडेट:साडेसहा महिन्यांनंतर रुग्णसंख्या शंभरीपार; शहरात 87 तर ग्रामीणमध्ये 16 जणांना कोरोना

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी (४ जानेवारी) शहरात ८७, तर ग्रामीणमध्ये १६ असे १०३ रुग्ण आढळले आहेत. १९ जून २०२१ नंतर म्हणजे साडेसहा महिन्यांनंतर औरंगाबादच्या रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे सांगितले.

मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात २४ जण कोरोनामुक्त झाले. त्यातील २० जण महापालिका हद्दीतील, तर चौघे ग्रामीणमधील होते. आजपर्यंत एक लाख ४६ हजार २०९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ५० हजार ३९ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ६५६ जणांचा मृत्यू झाला असून १७४ जणांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये रविवारी ३५, सोमवारी ३७ रुग्ण होते.

१९ जून २०२१ रोजी मनपा हद्दीत ३१, ग्रामीणमध्ये ८३ रुग्ण होते. मंगळवारी औरंगाबादेत ८७ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन ते तीन हजार चाचण्या करण्यात येत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण केवळ दोनच असले तरी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळणे, सातत्याने हात धुणे या नियमांचे पालन केले पाहिजे. लसीकरण करून घेणेही गरजेचे आहे.

ओमायक्रॉनग्रस्त दोन रुग्ण सुखरूप घरी पोहोचले : डॉ. मंडलेचा

औरंगाबाद शहरातील दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर महापालिकेच्या मेल्ट्रॉन आणि मेडिकव्हर या खासगी रुग्णालयात उपचार झाले. त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले, अशी माहिती डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. ते म्हणाले की, दोन्ही रुग्ण कुणाच्याही संपर्कात आले नसल्याने त्यांच्यापासून फैलाव होण्याचा कोणताही धोका दिसत नाही. दोन शिफ्टमध्ये दररोज २४०० ते २६०० चाचण्या होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...