आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना इफेक्ट:दहावीच्या निकालानंतर 54% विद्यार्थ्यांनी बदलले करिअरचे नियोजन, विद्यार्थ्यांत यंदा हटके करिअरचा विचार नाही

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 शहरांतील 200 विद्यार्थ्यांना चार प्रश्न विचारून निकालावर जाणून घेतले मत
  • करिअरविषयी विद्यार्थी निर्धास्त, पालक चिंतातुर

यंदाच्या वर्षी पदवीतील बहुतांश परीक्षा रद्द झाल्या. दहावीची परीक्षाही कोरोनाच्या सावटाखाली झाली. दरवेळेच्या तुलनेत या वर्षी परीक्षा देताना विद्यार्थ्यांवर काही अंशी दडपण आले होते. निकालही उशिरा लागल्याने मध्यंतरीच्या काळात पालक व विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली होती. बुधवारी अखेर निकाल लागला आणि ९५.३० टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. ‘दिव्य मराठी’ने राज्यातील १३ शहरांतील २०० विद्यार्थ्यांकडून निकालावर प्रतिक्रिया जाणून घेतली.

यात ५४ टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे पुढील करिअरच्या नियोजनावर परिणाम झाल्याचे मान्य करून यात बदल केल्याचे म्हटले आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांचा करिअर किंवा पुढील अभ्यासक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर बदलला नाही ना, याची पडताळणी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आली. यात ७१ टक्के विद्यार्थ्यांनी निकालावर आनंदी असल्याचे म्हटले. तर कोरोनाचे संकट आले नसते तर अधिक टक्केवारी मिळवता आली असती, अशी प्रतिक्रिया ६९ टक्के विद्यार्थ्यांनी दिली. तर २९ टक्के पालक हे पाल्याच्या निकालावर आनंदी नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.

१३ शहरांतील २०० विद्यार्थ्यांना चार प्रश्न विचारून निकालावर जाणून घेतले मत

1 दहावीच्या लागलेल्या निकालावर तुम्ही आनंदी आहात का?

होय : १४४ (७१.५%)

नाही : ५७ (२८.५%)

2 निकालावर कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी आहेत का?

होय : १४१ (७०.५%)

नाही : ५९ (२९.५%)

3 कोरोनाचे संकट आले नसते तर अधिक टक्के मिळाले असते असे वाटते का?

होय : १३९ (६९.५%)

नाही : ६१ (३०.५%)

4 करिअरच्या नियोजनावर कोरोनाचा काही परिणाम झालाय का?

होय : १०८ (५४%)

नाही : ९२ (४६%)

विद्यार्थ्यांत यंदा हटके करिअरचा विचार नाही, लॉकडाऊनच्या काळात समुपदेशन करताना डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांचे निरीक्षण

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी अखेर निकाल लागला. पण दरवेळेच्या तुलनेत विद्यार्थ्यांमध्ये याच्याबद्दल अधिक उत्सुकता नव्हती. अनेक विद्यार्थ्यांना हटके करिअर करण्याची इच्छा आहे, पण कोरोनामुळे मोठ्या शहरांत जाऊन शिकणे शक्य होत नसल्याने जो अभ्यासक्रम उपलब्ध आहे त्यात प्रवेश घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी समुपदेशन करताना बोलून दाखवल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-सिसोदे यांनी सांगितले. दरवर्षी निकालाबद्दल विद्यार्थ्यांत उत्सुकता असते. पण यंदा पालकांना मात्र मुलांची चिंता सतावत होती. परीक्षेनंतर लॉकडाऊन वाढत गेल्याने घरातच राहून विद्यार्थ्यांत सहजपणा आल्याचे डॉ. अपर्णा यांनी म्हटले.

करिअरविषयी विद्यार्थी निर्धास्त, पालक चिंतातुर

पेपर झाल्यावर विद्यार्थ्यांना काही दिवस निकालाची काळजी वाटली. पण नंतर ते निर्धास्त झाले. दुसरीकडे आई-वडील मात्र अस्वस्थ होते. मुलाने एखादी शाखा निवडली तर पुढे ऑनलाइन ट्यूशन, महाविद्यालय निवडण्यासाठी सोपे गेले असते, असे पालकांना वाटत होते. पण मुले मात्र बघू, करू या मूडमध्ये असल्याचे डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-सिसोदे यांनी सांगितले.