आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना इफेक्ट:लष्करात 61 हजार जवानांची कमतरता, त्यात कोराेनाचा घोर; नवी भरतीही स्थगित

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • अधिकारी-जवानांची तूट, आता कोरोनामुळे नवी भरतीही स्थगित

सतीश वैराळकर 

कोरोनामुळे देशातील सर्व क्षेत्रे प्रभावित होत असून भारतीय सैन्याला यामुळे मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय सैन्याने अधिकारी व जवानांची नियोजित निवड प्रक्रिया अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली आहे. सैन्याला आधीच ६१ हजार ४८५ अधिकारी व जवानांचा तुटवडा आहे. निवृत्त होणाऱ्याची संख्या पूर्वीइतकीच असून स्वेच्छानिवृत्ती, शहीद अथवा सेवेत असताना मृत होण्याचे प्रमाण व विविध मोहिमांत जखमी होणाऱ्या जवानांच्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणात ही तूट वाढत आहे. भविष्यात तूट भरून काढण्यास वेळ लागणार आहे. यातून देशाच्या सुरक्षेसंबंधीच्या चिंता वाढत आहे. 

निमलष्करी दलात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रादुर्भाव चिंतेचा विषय आहे. भारतीय सेना या प्रादुर्भावापासून अजून लांब असली तरी कोरोनामुळे रखडत चाललेल्या निवड प्रकियेमुळे भविष्यात सैन्याच्या‌ मोहिमांना याचा फटका बसू शकतो. यामुळे नियोजित मोहिमा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. खर्चावर बंधने घातली आहेत. प्रतिवर्षी सैन्यातून ६० हजारांवर अधिकारी व जवान निवृत्त होतात. मार्चपासून २० हजार सैनिक निवृत्त झाले आहेत. संसदेत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्यात ६१,४६५ जागा रिक्त आहेत. कोरोनामुळे यात अधिकची भर पडणार आहे. 

लष्कराला इतक्या मनुष्यबळाची कमतरता :

संरक्षण दलाच्या तिन्ही विभागात ५२ हजार ५८ इतकी इतर रँक म्हणजेच जवानांची कमतरता आहे. यात अधिकाऱ्यांची ९४२७ इतक्या कमतरतेमुळे ६१ हजार ४८५ इतक्या मनुष्यबळाची तूट आहे.

एनडीएची प्रक्रिया रखडली :

पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून (एनडीए) सैन्यात अधिकारी निवड केली जाते. निवडलेले छात्र इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून, एअर फोर्स अकादमी बेगमपेठ हैदराबाद, नेव्हल अकादमी कोची येथे जातात. कोरोनामुळे आता त्यांना पुढच्या प्रशिक्षणासाठी उशीर होईल. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे सैन्यात अधिकारी म्हणून निवडीसाठी एनडीएची वर्षातून दोनवेळा एप्रिल व सप्टेंबर मध्ये परीक्षा घेतली जाते. एकूण जागा ३४२ आर्मी, नेव्ही, नेव्हल अकादमी तांत्रिक व एअरफोर्ससाठी असतात. एप्रिल १९ रोजीची चालू वर्षीची एनडीएची परीक्षा १० जूनला घेण्याचे निश्चित केले आहे. एनडीएचे १ जुलैपासून सुरू होणारे अधिकारी तुकडीच्या प्रशिक्षणासंबंधी अद्याप घोषणा नाही. 

या तुकडीची निवड प्रक्रिया (परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय चाचणी व शारीरिक चाचणी) पूर्ण झाली असून गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. पर्यायाने जानेवारीत होणाऱ्या एनडी-२ ची परीक्षा प्रभावित होईल. पुन्हा सैन्य अधिकाऱ्यांच्या तुटीत भरच पडणार. 

जवानांच्या भरती प्रक्रियेवर परिणाम

देशात जवानांच्या भरतीसाठी ४७ शाखा भरती कार्यालये आहेत. याद्वारे मार्च ते मे महिन्यादरम्यान जवानांची भरती प्रक्रिया राबविली जाते. भरतीनंतर ९ महिन्यांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर त्यांना सैन्यात ड्युटीसाठी तैनात केले जाते. 

लॉकडाऊनमुळे तूट वाढणार

नियोजित प्रक्रियेनुसार भरती झाली असती तर ठरलेल्या काळात तूट भरून काढण्यास मदत मिळाली असती. भरतीचा कालावधी वाढल्याने प्रशिक्षणाच्या कालावधीही वाढेल. तूर्तास सैन्याची परीक्षा पद्धती ऑनलाइन करणे शक्य नाही. सैन्याच्या भरती रॅलीला हजारांवर विद्यार्थी उपस्थित असतात. यामुळे कोविडचा धोका वाढणार. 

सैन्यातील मनुष्यबळाची तूट भ्रामक : माजी मंत्री सुभाष भामरे

प्रत्येक देश सैन्य कमी करत आहे. भविष्यात पारंपरिक नव्हे डिजिटल युद्ध होईल. मोठे सैन्य परवडणारे नाही. सैन्यातील मनुष्यबळाची तूट भ्रामक असून अडचणीची नाही. आधुनिकीकरण समितीने मनुष्यबळ घटवण्याची शिफारस भारताने स्वीकारलेली नाही. मोबाइलप्रमाणे सैन्यातही क्षणोक्षणी बदलणारे नवीन तंत्रज्ञान येत असून ते स्वीकारावे लागेल. - खा. डॉ. सुभाष भामरे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...