आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली येथील शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णास भेटण्यासाठी गेलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने अधिकारी येताच थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा प्रकार गुरुवारी ता. 13 सायंकाळी साडेपाच वाजता घडला आहे. त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु करण्यात आले आहे. वैभव सरकटे (30, रा. समगा) असे त्या तरुणाचे नांव आहे.
याबाबत रुग्णालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये रुग्णांसोबत थांबणाऱ्या नातेवाईकांची गर्दी होऊ लागली होती. रुग्णांचे नातेवाईक दिवसभर रुग्णासोबत थांबून रात्री घरी जाऊ लागले होते. त्यामुळे हे नातेवाईकच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू लागले होते. त्यांना आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड वॉर्डमध्ये थांबण्यास मनाई केली. त्यानंतर त्यांच्या सरप्राईज व्हिजीटमध्ये आढळून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना थेट लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोविड वॉर्डच्या खाली पोलिस बंदोबस्त वाढविला तसेच ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी यांच्या नियुक्त्या करून रुग्णालयाच्या परिसरात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही दिल्या होत्या.
दरम्यान, समगा (ता.हिंगोली) येथील वैभव सरकटे (30) हा त्याच्या आजोबाला भेटण्यासाठी सायंकाळी पाच वाजता कोविड वॉर्डमध्ये आला होता. नेमके याचवेळी जिल्हाधिकारी जयवंशी रुग्णालयात भेटीसाठी गेले. त्यामुळे आता आपल्याला पकडून विलगीकरण कक्षात दाखल करतील या भितीने त्याने थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये त्याच्या हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली तर डोक्यालाही किरकोळ दुखापत झाली.
सदर प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीेने घटनास्थळी धाव घेऊन त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, सहाय्यक जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत त्याचा जवाब झाला नसल्याने त्याने नेमकी कशामुळे उडी मारली याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.