कोरोनाचे वाढते जाळे : सांगलीत 4, तर साताऱ्यात एक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण 

  • कोरोना रुग्णानंच आकडा आता महाराष्ट्रात ९७ वर येऊन पोहोचला आहे

दिव्य मराठी वेब टीम

Mar 24,2020 09:10:00 AM IST

सांगली : सांगलीतील सोमवारी ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कालपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसणाऱ्या सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.


सौदी अरेबियामधून ते प्रवासी सांगलीत आले होते. सर्वजण मूळचे इस्लामपूर येथील आहेत. त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चार दिवस उपचार सुरू होते. त्यांचे स्वॅब पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. एकूण १२ रुग्णांचे अहवाल पाठवण्यात आले होते. हे रुग्ण इस्लामपुरात कुणाकुणाला भेटले याचा तपास आरोग्य अधिकाऱ्यांसह पोलिस यंत्रणा करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


साताऱ्यात महिला कोरोना पॉझिटिव्ह


सातारा : रविवारी विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलेचा अहवाल प्राप्त झाला असून ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली. या महिलेला १५ वर्षापासून उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

X