आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:मुंबईतील बंदोबस्ताहून परतलेल्या 51 एसआरपी जवानांना कोरोनाचा संसर्ग

शेखर मगर | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना बटालियनचा निष्काळजीपणा, तीव्र लक्षणे असूनही १६ जणांना ठेवले एकत्र

बकरी ईद आणि राम मंदिर भूमिपूजन बंदोबस्तासाठी मुंबईला गेलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तुकडीतील अधिकाऱ्यासह एकूण ९२ पैकी ५१ जवानांना कोरोना संसर्ग झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईहून (८ ऑगस्ट) परतीच्या प्रवासात ९२ पैकी १६ जणांना तीव्र लक्षणे होती तरीही त्यांना जालन्यातील पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये तब्बल चार दिवस एकत्र ठेवण्यात आले. त्यामुळे १६ जवानांनी इतर ३५ जणांना संक्रमित केल्याचे उघडकीस आले.

१ ऑगस्टला बकरी ईद होती. त्यासाठी जालन्याची कंपनी बंदोबस्तासाठी ३० जुलैला रवाना केली होती. १० ड्रायव्हर, ८० जवान, २ उपनिरीक्षकांचा त्यामध्ये समावेश होता. १२ दिवसांचा बंदोबस्त केल्यावर ८ ऑगस्टला ही तुकडी रात्री जालन्यातील पोलिस ट्रेनिंग स्कूलला परतली. मात्र, परतीच्या प्रवासातच १६ जणांना तीव्र स्वरूपाची लक्षणे होती. त्यांना अलगीकरण कक्षात ठेवून कोरोना तपासणी करण्याऐवजी सर्वांसोबतच ठेवण्यात आले. दोन दिवसांनंतर मंगळवारी दुपारी १६ जणांना जिल्हा रुग्णालयात नेऊन आरटी-पीसीआर तपासणी केली. सर्वच जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे वरातीमागून घोडे दामटत ‘पीटीएस’मधील ७६ क्वॉरंटाइन कर्मचाऱ्यांची बुधवारी (१२ ऑगस्ट) तपासणी केली. त्यांचा गुरुवारी (१३ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता अहवाल आला. ७६ पैकी ३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ४१ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांनाही तूर्त क्वॉरंटाइन राहावे लागणार आहे.

समादेशकांनी फोन घेतला नाही :

कंपनीच्या व्यतिरिक्त ‘एसआरपीएफ’मधील आणखी १५ जणांची बुधवारी तपासणी करण्यात आली होती. त्यांचा अहवालही कंपनीच्या ३५ जवानांसोबत आला. त्यांनाही पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले आहे. आता ‘एसआरपीएफ’मध्ये ६६ जणांना लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. ‘एसआरपीएफ’ प्रशासनाच्या निष्काळजीपणासंदर्भात समादेशक डॉ. अक्षय शिंदे यांच्याशी मोबाइलवर संपर्क केला. पण त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...