आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखाजोखा:कोरोनापाठोपाठ मराठवाड्याला गुन्हेगारीचा विळखा; कोरोनाकाळात बाहेर पडलेल्या गुन्हेगारांनीही केले हात साफ, गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात खून, दराेडा, मंगळसूत्र चोरी तसेच वाहनचोरीच्या असंख्य घटना घडत अाहेत. गेल्या काही महिन्यांत शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकारही वाढले. बुधवारी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे बिअर बारमध्ये ६७ हजारांची रोख व ऐवज तसेच गुरुवारी सकाळी ११ वाजता औरंगाबादजवळील माळीवाडा भागात बंदुकीचा धाक दाखवून सव्वा लाखाची रोकड लुटण्यात आली. या दोन्ही घटनांत ३० ते ३५ वयोगटातील दोन युवकांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. आठही जिल्ह्यांत अशा घटना दरदिवशी घडत असल्याचे समोर येत आहे.

लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळात बालगुन्हेगारीचे वाढलेले प्रमाणही चिंताजनक आहे. कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आणि काेराेनाकाळात बहुतांश कारागृहातून गुन्हेगार बाहेर अाले. त्यामुळेही गुन्हेगारी वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नाेंदवले. अल्पवयीन मुलांना गुन्हे करायला लावले तर कायद्याने त्यांना शिक्षा हाेत नाही. याचाच फायदा उचलत अनेक ठिकाणी कुटुंबातील माेठे सदस्य मुलांकडून चोरी करून घेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हेगारीची वाढती दाहकता दर्शवणारी मराठवाड्यातील ही स्थिती.

दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू
कोविडमुळे अनेक उद्योगधंदे पडले. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून उदरनिर्वाहाचे साधनच नसल्याने गुन्हेगारी वाढली. याशिवाय पोलिसांवरही अनावश्यक कामाचा ताण आहे. कोविडमध्ये बंदोबस्त व इतर कामे दिली गेल्याने त्यांना गुन्हेगारांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळाला नाही. पोलिसांनीही रात्रीची गस्त, बीट पेट्रोलिंग वाढवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे. - माणिक पेरके, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक.

बीड : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना जास्त
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत वाहनचोऱ्या वाढल्या आहेत. मात्र मागील महिन्यात ६ जणांची टोळी पकडून ३१ दुचाकींचा तपास लावण्यात यश मिळाले होते. या टोळीतील सर्वजण पंचविशीच्या आतील होते. केज तालुक्यात दाेन दिवसांपूर्वीच राज्य राखीव दलाच्या जवानाला मारहाण करून लुटण्यात अाले हाेते. जिल्ह्यात जानेवारी ते जूनदरम्यान २९ खून, ११ दरोडे, ६२४ चोऱ्या, १०९ घरफाड्या झाल्या.

नांदेड/परभणी : गोळीबाराच्या घटना वाढल्या, मंगळसूत्र चोऱ्याही अधिक
मागील दोन महिन्यांपासून नांदेड शहरात गोळीबार, लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. ११ ऑगस्टला श्रीनगर भागात गोळीबार झाला. याच दिवशी गोकुळनगर भागात बंदुकीच्या धाकावर एका व्यापाऱ्याचे सात लाख रुपये लुटण्यात आले. काही दिवसांपूर्वी जुन्या नांदेड भागात टोळीयुद्धातून खून झाला. तसेच असर्जन, कौठा, काकांडी, तुप्पा, वाजेगाव, सिडको या भागात वाटमारीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. परभणीत मंगळसूत्र चोरीच्या घटना अधिक घडल्या आहेत.

उस्मानाबाद : कळंब, भूम, वाशीत जास्त गुन्हे
गेल्या काही दिवसांत चाेरीच्या घटनांत वाढ झाली. जिल्ह्यात २ महिन्यांत जवळपास १९८ घटना घडल्या. यात १४ घटना दरोड्याच्या असून सर्वाधिक कळंब, भूम, वाशी तालुक्यात घडल्या. तसेच घरफाेड्या ७०, ३७ दुचाकी चोरी, १५ घटना गर्दीत दागिने पळवणे, ५१ घटना बाजारात मोबाइल चोरी, १० घटना शेतातील साहित्य चोरीच्या आहेत. जवळपास सर्वच घटनांमध्ये आरोपी अज्ञात चोरटे आहेत.

हिंगाेली : हरियाणाच्या टाेळीने एटीएम पळवले
जिल्ह्यात बॅग हिसकावणे, चाेरी, दराेड्यांचे प्रमाण अधिक अाहे. यात औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम हरियाणाच्या चोरट्यांनी पळवल्याची शक्यता पोलिसांना वाटते. याच्या तपासासाठी चार पथके स्थापन केली आहेत. गेल्या अडीच महिन्यात हिंगोलीत ४ जबरी चोरी, २३ घरफोड्या, १ खून, ३४ वाहन चोऱ्या व एक बॅग हिसकावण्याचा प्रकार घडला आहे.

औरंगाबाद : परराज्यातील टाेळ्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय
जिल्ह्यात लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत मंगळसूत्र चाेऱ्या वाढल्या. यात इराणी टोळीसह शहरातील कुख्यात गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. मोबाइल चोरीत तर तामिळनाडूतील वेल्लाेरची टाेळी सक्रिय अाहे. अल्पवयीन मुले गुन्हे करण्याकडे अधिक वळत अाहेत. दुकानाचे शटर उचकटून अल्पवयीन मुले किराणा व इतर साहित्य चाेरत असल्याच्या घटना समाेर अाल्या. धक्कादायक म्हणजे पालकांचा याला पाठिंबा असल्याचे दिसते.

जालना : रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा सहभाग अधिक
जिल्ह्यात गुन्हेगारीतील घटनांमध्ये बहुतांश ठिकाणी रेकाॅर्डवरील गुन्हेगार अाहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी पोलिसांनी काही जणांचे प्रस्ताव तयार करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक व स्थानिक गुन्हे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग हे प्रस्ताव तयार करत आहेत.

२ महिन्यांतील घटना

  • चोऱ्या 19
  • घरफोड्या 13
  • वाहनचोरी 26
  • मंगळसूत्र चोरी 03
  • लूटमार 04
बातम्या आणखी आहेत...