आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फटकारे:कोरोनावरून विदेशी तबलिगींना बनवले बळीचा बकरा : खंडपीठ, 30 परदेशी नागरिकांविरोधातील एफआयआर रद्द

औरंगाबाद, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिथी देवो परंपरेनुसार ही वागणूक होती का? न्यायालयाचा संतप्त सवाल

नवी दिल्ली येथील तबलिगी जमातसाठी आलेल्या ३० परदेशी नागरिकांविरोधातील प्रथमदर्शनी अहवाल (एफआयआर) रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. भारतीय परंपरेत पाहुण्यांना ‘अतिथी देवो भव’ म्हटले जाते तरीही या परदेशी नागरिकांना मदत करून सन्मानाची वागणूक देण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांना ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले, अशा कडक शब्दांत न्यायालयाने राज्य शासनावर ताशेरेे ओढले आहेत.

मार्चअखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात सुरू झाल्यानंतर नवी दिल्ली येथील तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेल्या ३० परदेशी नागरिकांविरोधात अहमदनगर येथील तीन पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. या नागरिकांच्या वतीने अॅड. मजहर जहागीरदार यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी याप्रकरणी अंतिम सुनावणी झाली.

राजकीय अपरिहार्यतेपोटी कारवाई
‘राजकीय अपरिहार्यतेपोटी’ राज्य सरकारने कारवाई केली. पोलिसांनीही अगदी एखाद्या यंत्रवत पद्धतीने काम केले. राजकीय सत्ताधारी महामारी आणि संकटकाळात बळीचा बकरा शोधत होती आणि त्यासाठी परदेशी नागरिकांना बळीचा बकरा बनवण्यात आले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

विशिष्ट समाजाबद्दल द्वेष, तणाव निर्माण करण्याचा माध्यमांचा हेतू
आमचा भारतीय न्यायपालिकेवर विश्वास होता. या निकालाने तो आणखी दृढ झाला आहे. काही प्रसारमाध्यमांनी त्या काळात कोरोनाच्या संसर्गासाठी विशिष्ट समाजाला लक्ष्य केले होते. तणाव आणि द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. पण खंडपीठाने त्यांच्या हेतूचा पर्दाफाश केला आहे. त्या माध्यमांनाही या निकालाने जोरदार चपराक लगावली आहे. - इम्तियाज जलील, खासदार

अतिथी देवो परंपरेनुसार ही वागणूक होती का? न्यायालयाचा संतप्त सवाल
तबलिगींचा युक्तिवाद
व्हिसा नियमावलीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले नाही. भारतात येत असताना आमची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी केली होती. व्हिसामध्ये ठरवून दिलेल्या प्रार्थनास्थळीच आम्ही भेटी दिल्या. अन्य ठिकाणी गेलो नसल्याचे परदेशी नागरिकांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

ही आपलीच चूक
परदेशी नागरिकांचा आदर करण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करतो ही आपली चूक आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्यामुळे ते रद्द करण्यात यावेत, असे आदेश खंडपीठाने दिले. गुन्हे रद्द झाल्यामुळे त्यांचा मायदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे अ‍ॅड. जहागीरदार यांनी सांगितले.

काही टिप्पण्यांवर न्यायमूर्ती सेवलीकर यांची असहमती
एफआयआर रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल न्यायमूर्ती सेवलीकर यांनी सहमती दर्शवली आहे. मात्र, न्या. नलावडे यांच्या काही टिप्पण्यांबद्दल ते असहमत होते. परंतु नेमक्या कोणत्या भाष्याबद्दल ते असहमत होते ते नमूद केलेले नाही.

वृत्तवाहिन्यांना फटकारले : तबलिगींमुळे कोरोनाचा फैलाव सुरू झाला अशा बातम्या अनेक वृत्तवाहिन्यांनी त्या काळात प्रसारित केल्या. तबलिगींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. याबद्दलही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून वृत्तवाहिन्यांनी अशा पद्धतीने गवगवा (प्रपोगंडा) करायला नको होता, असे खंडपीठाने नमूद केले आहे.

अपप्रचारामुळे मुस्लिमांविरोधात द्वेष पसरला : हा निर्णय योग्य वेळी आला असल्याचे सांगून न्यायालयाच्या निर्णयाचे एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्वागत केले आहे. भाजपला वाचवण्यासाठी मीडियाने तबलिगी जमातला बळीचा बकरा बनवले. या अपप्रचारामुळे देशभरात मुस्लिमांविरोधात द्वेष पसरला, असे ट्वीट अोवेसींनी केले आहे.