आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध कोरोनाविरुद्ध:मराठवाड्यात ४० नवे रुग्ण, औरंगाबादेत अकरावा बळी; हिंगोलीत आणखी 14 जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

औरंगाबाद/ हिंगोली/ लातूर/ नांदेडएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत एकूण रुग्णसंख्या ३२१ वर, नांदेडमधील चौघे अजूनही बेपत्ताच

मराठवाड्यात कोरोनाचा संसर्ग मंगळवारीही वाढताच राहिला. विभागात औरंगाबाद या सर्वात मोठ्या हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात मंगळवारी २४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रुग्णांची संख्या ३२१ वर गेली. तर, हिंगोलीमध्ये आणखी १४ जवान आणि एका परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ९० वर गेली. उदगीरमध्ये आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे. दरम्यान, उस्मानाबाद, परभणी येथे नव्या रुग्णांची भर पडलेली नाही. दुसरीकडे नांदेड येथून बेपत्ता असलेले चार कोरोनाबाधित मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सापडले नव्हते. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली.

औरंगाबादेत एकूण रुग्णसंख्या ३२१ वर

औरंगाबाद | औरंगाबादेतील काेराेना रुग्णांच्या संख्येने तीनशेचा टप्पा पार केला. मंगळवारी सकाळी आणखी २४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने शहरातील बाधितांची एकूण संख्या ३२१ झाली. टाऊनहॉल परिसरात राहणाऱ्या एका ५८ वर्षीय काेराेनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या ११ झाली. जलाल काॅलनी, हिलाल काॅलनी, आसेफिया काॅलनी, किलेअर्क, समतानगर, मुकुंदवाडी- संजयनगर हे हाॅटस्पाॅट ठरले हाेते. मंगळवारी जयभीमनगरचीही यात भर पडली. मंगळवारी सापडलेल्या २४ रुग्णांपैकी २१ रुग्ण जयभीमनगरमधील आहेत. अजबनगरमधील एक महिला, संजयनगरमधील पुरुष, बाैद्धनगरातील पुरुषाचा समावेश आहे.

बीड : दोघे संशयित पसार

एका मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी आणले असता त्यांनी पाेलिसांना गुंगारा देत कोरोना वाॅर्डातून पलायन केले. शेख इरफान शेख बिबन व आसेफ गफार बागवान अशी पसार आरोपींची नावे आहेत. 

हिंगोलीत रुग्णसंख्या ९० वर : 

हिंगोली येथील आणखी १४ जवानांचे स्वॅब रिपाेर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर जिल्हा रुग्णालयात कार्यरत एका परिचारिकेचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सोमवारी ७५ वर असलेली रुग्णसंख्या आता ९० झाली आहे. यात एसआरपीएफच्या ८४ जवानांचा समावेश आहे. हे जवान मुंबई व मालेगाव येथे कार्यरत होते.

उदगीरमध्ये एक नवीन रुग्ण : 

उदगीर (जि. लातूर) येथील आणखी एकाचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या १४ वर गेली. लातूर येथे आजपर्यंत एकूण २३० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २२२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून यापूर्वीच ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह होते.

बीडमध्ये सर्व ९ अहवाल निगेटिव्ह : 

बीड येथील ९ व्यक्तींचे अहवालही तपासणीसाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी सर्वच ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

नांदेडमधील चौघे अजूनही बेपत्ताच : 

नांदेड येथे कोरोनाबाधित चार रुग्ण अजून पोलिस आणि आरोग्य प्रशासनाला सापडले नाहीत. शनिवारी लंगरसाहिब गुरुद्वारात ९७ जणांचे नमुने घेण्यात आले. या संशयित रुग्णांना प्रशासनाने क्वारंटाईन केले नाही किंवा त्यांना रुग्णालयातही दाखल केले नाही. यातील २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. यातील १६ जणांना प्रशासनाने ताब्यात घेतले. परंतु, चार जण अजूनही बेपत्ता आहेत.

बातम्या आणखी आहेत...