आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवा ‘प्रयोग’:‘पोट भरले’च नाही; आता 400 ऐवजी 550 ग्रॅम जेवणाचे कंत्राट, मनपाने काेराेनाग्रस्तांसाठी काढली पुन्हा निविदा

आैरंगाबाद ( नामदेव खेडकर )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

|

महापालिकेच्या कोविड केअर आणि क्वाॅरंटाइन सेंटरमधील रुग्णांना दिले जाणारे जेवण अपुरे असल्याची खुद्द मनपा प्रशासनानेच मान्य केले अाहे. सध्या रुग्णांना ४०० ग्रॅम जेवण दिले जाते. आता नव्याने निविदा प्रक्रिया करून ५५० ग्रॅम जेवण दिले जाणार आहे. काेराेनाग्रस्तांच्या जेवणासाठी गेल्या चार महिन्यातील मनपाचा हा पाचवा ‘प्रयाेग’ अाहे. आतापर्यंत झालेल्या चारही प्रयोगांमध्ये आलटून पालटून “तेच’ ठेकेदार होते. आता नव्या निविदा प्रक्रियेतही हा “योगायोग’ पाहायला मिळू शकतो. सुरुवातीला मनपा एका रुग्णाच्या चहा, नाष्टा, जेवणासाठी १५० रुपये मोजत होती. तो दर आज २१० वर पोचला. आता जेवणाचे प्रमाण वजन वाढवल्याने हा दर आणखी वाढण्याची शक्यता अाहे. मार्च महिन्यात महापालिकेने सेंटर्स सुरू केल्यानंतर विनानिविदा चार जणांना भोजन पुरवठ्याचे कंत्राट दिले हाेते. त्यांच्या दर्जाबाबत तक्रारी येऊ लागल्या म्हणून मनपाने एक-एक करत सर्वांचेच काम थांबवले आणि स्वतःच स्वयंपाक तयार करण्यास सुरुवात केली. पण, यात महापालिका सपशेल अपयशी ठरली. आठच दिवसांत त्यांना किचन “लॉकडाऊन’ करावे लागले. दरम्यानच्या काळात महापालिकेने जेवण पुरवठ्यासाठी निविदाही मागवल्या होत्या. यात एका निविदधारकाने १३५ हा दर दिला होता. मात्र, सर्वात कमी दर भरलेल्या त्या एकट्या निविदधारकाला डावलून अन्य सर्वांनाच त्यांनी जो दर भरला, त्या दराने हे काम देण्यात आले. विशेष म्हणजे ती निविदा प्रक्रिया कागदोपत्री रद्द दाखवून मनमानी दराने हे काम दिले होते.

कमी दर भरलेल्या ठेकेदाराची अाम्हाला खात्री नव्हती

पूर्वीच्या निविदा प्रक्रियेत ज्याने सर्वात कमी दर भरला होता, तो इतक्या मोठ्या प्रमाणावर जेवण पुरवठा करू शकेल, याची आम्हाला खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द केली. सध्या जेवण पुरत नसल्याच्या काही रुग्णांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता ५५० ग्रॅम जेवण दिले जाणार आहे. शिवाय रोज एक हंगामी फळही दिले जाईल. - सखाराम पानझडे, शहर अभियंता, मनपा

चार महिन्यांनंतर जाग : काेराेनाग्रस्त रुग्णांचे जेवण अाता ‘तब्बल’ १५० ग्रॅमने वाढवले आतापर्यंत रुग्णांना ४०० ग्रॅम जेवण दिले जात. अनेक रुग्ण जेवणाचा दर्जा, वेळा आणि प्रमाण कमी असल्याबद्दल तक्रारी करायचे. मात्र, त्याकडे मनपाने सपशेल दुर्लक्ष केले. आता चार महिन्यांनंतर मनपाला जाग अाली असून, रुग्णांना जेवण पुरत नसल्याचे जणू त्यांनी मान्य केले आहे. म्हणूनच नव्याने राबवल्या जाणाऱ्या निविदा प्रक्रियेत जेवणाचे “माप’ ४०० वरून ५५० ग्रॅमपर्यंत वाढवले आहे.

पुन्हा पुरवठादार तेच? आतापर्यंत महापालिकेने जे चार प्रयोग केले, त्या सर्वात पहिल्यापासून असलेल्या पुरवठादारांपैकी अनेक जण आलटून-पालटून होते. आता मनपाने मागवलेल्या निविदाही तेच ठेकेदार भरत आहेत. म्हणजे काहीही करून त्याच पुरवठादारांना काम मिळण्याचा “योगायोग’ पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे मनपाला प्रत्येक वेळी दर वाढवून द्यावा लागत आहे. त्यामुळे हे प्रयोग नेमके रुग्णांच्या हिताचे की पुरवठादारांच्या, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

काढा दिलाच नाही : मनपाने स्वतः किचन सुरू केले तेव्हा प्रत्येक रुग्णाला आयुष मंत्रालयाने शिफारस केलेला आयुर्वेदिक काढा देण्याचे जाहीर केले होते. मात्र एकही दिवस रुग्णांना काढा दिला नाही. काढ्यासाठी आवश्यक असणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, त्यामुळे काढा रद्द केल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...