आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:आष्टीच्या कोविड सेंटरमधून रुग्ण जातात मॉर्निंग वॉकला,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आमदारसुद्धा बोलत नाही, काय लिहायचे ते लिहा...'

कोरोनाची दुसरी लाट सक्रिय होत असताना दुसरीकडे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्ण ड्यूटीवरील वॉर्डबॉय मोबाइलमध्ये गुंग असल्याची संधी शोधत थेट मॉर्निंग वॉकसाठी भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात जात असल्याची धक्कादायक बाब समाेर आली. याबाबत ‘दिव्य मराठी’ने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ‘मला या तालुक्यातील तीनही आमदार काहीच बोलत नाहीत, तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण?’ असे बाेलून आपली जबाबदारी झटकली. तर तहसीलदारांनी याप्रकरणी चौकशी करून थेट कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले, तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यापुढे बाधित रुग्ण बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घेणार असल्याचे सांगितले.

दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने गुरुवारी सकाळी सात वाजता आष्टी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली. तेव्हा कोविड सेंटरमध्ये शुकशुकाट दिसून आला. सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्ण कुठे गेले याचा शोध घेतला असता कोरोनाबाधीत रुग्ण चक्क माॅर्निंग वॉकसाठी सेंटरच्या शेजारील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात फिरण्यासाठी गेल्याचे दिसून अाले. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये सध्या २० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत अाहेत. यात १० महिला अाणि १० पुरुषांचा समावेश आहे.

रुग्णांची चौकशी करणार

प्रत्येक वेळेस कोरोनाबाधित रुग्णांना जर नातेवाइक भेटायला आले आणि त्यांना भेटण्यासाठी सोडले नाही तर ते आरोग्य कर्मचाऱ्यांशी अरेरावी करतात, त्यामुळे वाद निर्माण होतात. जे कोरोना रुग्ण सेंटर सोडून बाहेर गेले त्यांची चौकशी करून पुन्हा ते बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घेऊ. डाॅ. रामदास मोराळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, आष्टी.

आमदारसुद्धा बोलत नाही, काय लिहायचे ते लिहा...

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने या वेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित डोके यांना फोनवर विचारणा केली असता ते म्हणाले, ‘तुम्ही एक दिवस येथे येऊन ड्यूटी करा मग तुम्हाला कसे असते ते कळेल. तुम्हाला काय लिहायचे ते लिहा, मी कुणाला घाबरत नाही. तालुक्याला तीन आमदार असूनसुद्धा मला कुणी बोलत नाही’ असा संवाद साधून भ्रमणध्वनी कट केला. तर आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राहुल टेकाडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

चौकशी अन् कारवाई करू

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून जर रुग्ण असे बाहेर येत असतील तर हा प्रकार गंभीर अाहे. यामुळे दुसऱ्यांनाही कोरोना होईल. जर असा प्रकार झाला असेल तर आपण यावर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. राजाभाऊ कदम, तहसीलदार, आष्टी.

बातम्या आणखी आहेत...