आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोरोनाच्या लाटांनी खासगी बस व्यवसायाचे चाकच निखळले, अनेकांनी बस विकल्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन लाटांनी खासगी ट्रॅव्हल्स बस व्यवसायाचे चाकच निखळले आहे. पर्यटन ठप्प झाले. वर्क फ्रॉम होम, लग्न समारंभावरील निर्बंधांनी प्रवासावर मर्यादा आल्या. बस जागेवरच उभ्या आहेत. बँकेचे हप्ते, कर, थकलेले जागा भाडे, घर चालवण्यासाठी अनेकांनी बस, शेती विकली. बसमालक तिकीट एजंट झाले.

पहिल्या लाटेत २३ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० म्हणजे पाच महिने बस उभ्या होत्या. अनलॉकमध्ये बसचे सॅनिटायझेशन, प्रवाशांना सॅनिटायझरचे तीन पाऊच, मास्क, टोपी, ग्लोव्हज, पेपर सोप, युज अँड थ्रोच्या बेडशीट पुरवणे, थर्मामीटर, ऑक्सिमीटर बंधनकारक करण्यात आले. ५० टक्के प्रवाशांना परवानगी होती. लॉकडाऊनमध्येच उन्हाळ्याच्या सुट्या, सण, पर्यटन आणि लग्नसराईचा हंगाम गेला. वर्क फ्रॉम होममुळे वीकेंडचे प्रवासी घटले. दुसऱ्या लाटेत २२ एप्रिलपासून परत निर्बंध आले, व्यवसाय ठप्प झाला. उत्पन्न कमी, खर्च अधिक अशी परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्र बस ओनर अँड ट्रॅव्हल्स एजंट्स वेल्फेअर असोसिएशननुसार देशात ८३ टक्के प्रवासी बसने तर १७ टक्के रेल्वे, हवाई मार्गाने प्रवास करतात. महाराष्ट्रात १७ हजार लक्झरी बस धावतात. त्यावर ड्रायव्हर, क्लीनर, बुकिंग स्टाफ, एजंट, मेकॅनिक असे ३० लाखांहून अधिक जण अवलंबून आहेत.

बहिणीचा विवाह थांबवला : माहूर (जि.नांदेड) येथे सागर दुधे सात वर्षांपासून शिवगंगा ट्रॅव्हल्स चालवतात. कोरोनापूर्वीपासून २२ जण कामाला आहेत. लॉकडाऊनमध्ये, एकालाही कमी नाही केले. ट्रॅव्हलसोबतच आरओ वॉटरचा व्यवसाय आहे. स्वत:सह सर्वजण तेथे काम करतायत. कर्मचारी जगवण्यासाठी बहिणीचे लग्न थांबवले. कोरोनानंतर तिला थाटात सासरी पाठवू, असे ते सांगतात.

ट्रॅव्हल्स एजन्सी मालक झाला एजंट
बीडचे पठाण साबेर अहमद यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये स्वत:चे ट्रॅव्हल्स सुरू केले. कर्ज घेऊन ५ बस घेतल्या. ६ महिन्यांत कोरोनाची पीक आले. कर्ज फेडण्यासाठी कार, पत्नीचे दागिने विकले. घरात पत्नी, ३ मुले, आई-वडील, बहिणीची एक मुलगी असे ८ जण आहेत. घर चालवण्यासाठी आता एका ट्रॅव्हल्समध्ये नोकरी धरली. येथे बुकिंग झाले तरच पगार मिळतो.

शेकडोंच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण बनले शेतमजूर
बस विकल्या, आता दुकान टाकणार

इम्रान मनसब खान औरंगाबादेत ८ वर्षांपासून या व्यवसायात आहेत. जम बसल्यावर कर्ज काढून ७ बस घेतल्या. मात्र, लगेच लॉकडाऊन लागला. खर्च भागवण्यासाठी ४ बस विकाव्या लागल्या. राहिलेल्या ३ ठेवणेही कठीण जात आहे. त्या विकून किराणा दुकान टाकण्याचा विचार आहे. पूर्वी १४ कर्मचारी होते. आता दोन आहेत. पूर्वीची दिवसाची लाखाची उलाढाल हजार-दोन हजार रुपयांवर आली आहे.

बस क्लीनरचा झाला शेतमजूर
बेळगव्हाणचे (जि. यवतमाळ) प्रवीण राठोड यांच्या घरात सगळे शेतमजूर. काही वेगळे करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी लातूर गाठले. डॉल्फीन ट्रॅव्हल्समध्ये क्लिनरचे काम धरले. लॉकडाऊनमध्ये पगार बंद झाला. घरात आई-वडील, पत्नी व दोन मुली आहेत. खर्च भागत नसल्याने गाव गाठलेे. शेतात मजुरी करतोय. जे करायचे नव्हते तेच कोरोनाने करावे लागत असल्याचे ते सांगतात.

कर्जामुळे शेती काढली विक्रीस
तुळजापूरचे अशोक लोखंडे १० वर्षांपासून देवराज ट्रॅव्हल्स चालवतात. मंदिर बंद असल्याने व्यवसाय ठप्प आहे. पैशाअभावी बारावीतल्या मुलाला शिकवणीही लावली नाही. नर्स असणाऱ्या पत्नीने पहिल्या लाटेत काम टाळले. आता खासगी दवाखान्यात कामावर जातात. बार्शी येथे शेती आहे, त्यात अपयश आले. उत्पन्न दूरच, ८ लाखांचे कर्ज झाले. आता शेती विकायला काढली आहे.

बातम्या आणखी आहेत...