आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेत प्रत्येक दुकानदाराला कोरोना टेस्ट बंधनकारक, कोविड टेस्ट शिवाय दुकान उघडता येणार नाही

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 जुलै रोजी दुपारपासून तपासणीस होणार प्रारंभ

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा आज महत्वपूर्ण निर्णय घेतला. भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन आणि किराणा दुकानदाराने रविवार पूर्वी कोविड-19 टेस्ट करणे बंधन कारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल त्यालाच रविवार पासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार.

शनिवारी रात्री बारा वाजता नियोजित संचारबंदी संपुष्टात येणार आहे. रविवारी ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल. शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, दूध विक्रेते, चिकन- मटन, किराणा दुकानदारांना पहिल्या टप्प्यात प्रमाणपत्र मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यापाऱ्याकडे प्रमाणपत्र नाही त्याने दुकान उघडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात सर्व व्यापाऱ्यांचा समावेश

दुसऱ्या टप्प्यात मेडिकल दुकानदार, इलेक्ट्रीक, शोरूम, पंचर दुकानदार यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांना 25 ते 31 जुलैपर्यंत कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शहरात व्यापक प्रमाणात तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घ्यावा असेही प्रशासक यांनी नमूद केले.

व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी तपासणी टीम

जिल्हा व्यापारी महासंघ, भाजीपाला विक्रेत्यांच्या संघटना आणि इतर व्यापाऱ्यांशी समन्वय साधून महापालिकेने शनिवारपासून  शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल 15 मोबाईल टीम तपासणीसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. निगेटिव्ह आलेल्या व्यापाऱ्याला जागेवरच कोविड-१९ निगेटिव्ह असे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जाधव वाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 टीम तैनात राहतील. पहिल्या टप्प्यात ज्या व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यांनी तपासणी करून घ्यावी मगच दुकान उघडावे असे आवाहन पांडेय यांनी केले.

400 एमसी कर्मचाऱ्यांची टीम 

सध्या संचारबंदीत पोलिसांसोबत प्रत्येक पॉईंटवर काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी नेमण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या टीम सोबत हे कर्मचारी मदतनीस म्हणून काम करतील.  प्रमाणपत्र देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.

औरंगाबादकरांचे आरोग्य त्यांच्याच हाती

शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले प्रमाणपत्र नसेल त्यांच्याकडून कोणतेही सामान खरेदी करण्यात येऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

गुजरातचे सुपर स्प्रेडर अभियान, हजारो भाजीपाला-फळ विक्रेत्यांची कोरोना टेस्ट

औरंगाबाद प्रमाणेच गुजरातच्या अहमदाबाद शहरात सुद्धा भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसह दुकानदारांच्या कोरोना टेस्टसाठी अभियान सुरू करण्यात आले होते. मे महिन्यात सुरू केलेल्या या मोहिमेला टार्गेट द सुपर स्प्रेडर असे नाव देण्यात आले होते. दुकानदार, भाजीपाला, फळ, मेडिकल शॉप आणि इतर विक्रेत्यांना यात सुपर स्प्रेडर मानण्यात आले होते. अशा व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास कोरोनाचा फैलाव अधिक होतो असा निष्कर्ष निघाला होता. या मोहिमेत एका आठवड्यामध्ये 33,500 जणांची स्क्रीनिंग झाली. त्यापैकी 12500 जणांची यादी करून कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. त्यातील 700 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्ह्यात शुक्रवारी 338 पाॅझिटिव्ह, 8 जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी काेराेनाचे 338 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा मृत्यू झाला. आता एकूण रुग्णसंख्या 10,082 तर मृत्यू 385 झाले आहेत. 5861 रुग्ण बरे झाले असून 3836 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.