आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा वाढता कहर पाहून त्यावर पुन्हा एकदा संचारबंदीसारखे कठोर उपाय करण्याकडे प्रशासन वळले आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्रीतून शहरात संचारबंदीचा निर्णय घेत आठ दिवसांसाठी बीड जिल्हा लॉक केला आहे. शहराच्या सीमाही बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातही रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागल्याने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ३ ते ५ जुलै अशी तीन दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. लातूर मनपानेही १४ दिवसांची संचारबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. लातुरातही संचारबंदी लागण्याची शक्यता आहे.
परभणीत तीन दिवसांचा संचारबंदीचा डोस
मागील रविवारपासून सलग पाच दिवसांत दररोजच कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शुक्रवार ते रविवार तीन दिवसांसाठी संचारबंदीचा डाेस दिला अाहे. गुरुवारी शहरातील दर्गा रोडवर दोन तर झरी येथे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२२ वर पोहाेचली आहे. चौघांचा मृत्यू झाला असून ९१ रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या २७ रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २३ व २४ जून रोजी पाच रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी २५ ते २७ दरम्यान संचारबंदी लागू केली होती. त्यानंतरही सोनपेठ, जिंतूर, झरी या गावांमध्ये रुग्ण आढळून आल्यानंतर तेथेही संचारबंदी लागू झाली. यात मागील रविवारपासून दररोज चार, तीन अशी रुग्ण संख्या येतच राहिली. परिणामी संसर्ग वाढत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात पाच किमी अंतरापर्यंत तर जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये तीन किमी अंतरात ही संचारबंदी लागू राहणार आहे. प्रशासनाने बँकाही दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.
संचारबंदीमुळे सलून सुरू अादेशाला कात्री
तब्बल १०० दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील केशकर्तनालये सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिले. तर अवघ्या काही क्षणातच तीन दिवसीय संचारबंदीचे आदेशही लागू केल्याने या सलूनचालकांवर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती ओढवली आहे. नाभिक संघटनांनी नियमांच्या पालनासह व्यवसायाची परवानगी मागितली होती. मात्र राज्य पातळीवरच हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. गुरुवारी अटी व शर्थीच्या अधीन राहून या व्यवसायाला परवानगी देण्यात आली. शुक्रवारपासूनच पुढील आदेशापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत सलून सुरू ठेवण्याचे आदेशही पारीत करण्यात आले. मात्र काही वेळातच प्रशासनानेतीन दिवसांची संचारबंदी लागू केल्याने सलून देखील आता या तीन दिवसांत सुरू होऊ शकणार नाहीत.
लातूर : साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जरूर हवे, पण आधी उपायही गरजेचे
लातूर शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता साखळी तोडण्याकरिता शनिवार पासून १४ दिवसाचे कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी गुरुवारी लातूर मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान शहरात लॉकडाऊन घेण्यापूर्वी मनपा आणि प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
लातूर महापालिकेत बुधवारी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या उपस्थितीत शहरातील कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समिती सभापती दीपक मठपती, नगरसेवक राजासाब मणियार, मनपा आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरात राबवण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याकरिता कठोर अमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात पुन्हा एकदा 14 दिवसांचे लॉकडाऊन करण्यावर चर्चा झाली. उपस्थितांसह सर्व मनपा पदाधिकारी, सभागृह नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष यांनाही दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली. सर्वांची सहमती घेऊन शहरात पुन्हा लॉकडाऊन करावे असे मागणीचे पञ जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
उपाययोजना करूनच लॉकडाऊन करावे - भाजप :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या दरम्यान लातूर शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागली असल्याने कोरोना साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन करावे, अशी मागणी करीत शहर जिल्हा भाजपने करतानाच टाळेबंदीच्या आधी कोरोना रोखण्याबाबतच्या उपाययोजना कराव्यात, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
बीड : समूह संसर्गाचा उद्रेक टाळण्यासाठी शहर आठवडाभरासाठी बंद
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाली आहे. बुधवारी सापडलेल्या तीन रुग्णांपैकी दोघांना कोणताही प्रवास इतिहास अथवा बाधितांच्या संपर्काचा इतिहास नाही. एक वृद्धा तर तीन महिन्यांपासून घरातच आहे. असे असतानाही तिला कोरोनाची बाधा झाल्याने समुह संसर्गावर शिक्कामोर्तब झाले. समुह उद्रेक टाळण्यासाठी बुधवारी रात्रीच तातडीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारपासून बीड शहर ९ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. गुरुवारी स्वत: रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्यांना समजही दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सव्वाशेपार गेला आहे. मे व जून या दोन महिन्यांत १२६ नवे रुग्ण आढळले आहेत तर ६ जणांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सापडत असलेले रुग्णांत बहुतांशी रुग्ण हे मंुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद अशा कोरोना हॉट स्पाॅटमधून आलेले आणि त्यांच्या संपर्कातील होते. परंतु, आता कोरोनाचा समुह संसर्ग सुरू झाल्याची खात्री पटावी, असे रुग्ण सापडत आहेत जे घराबाहेरही पडले नाहीत, असे लोक काेरोनाबाधित आढळले आहेत. ज्या वृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले त्या महिलेच्या मुलांचे कापड दुकान आहे. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आहे, दुकानात येणाऱ्यांची नोंद नसल्याने संपर्क शोधताना अडचणी आहेत. हे ओळखून आता ९ जूलैपर्यंत बीड शहर पूर्णपणे लॉक केले आहे. कोणालाही शहरात प्रवेश नाही िकंवा बाहेर जाता येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.