आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाची महामोहीम:मराठवाडा सज्ज, प्रत्येक केंद्रावर एका दिवसात 100 जणांना दिली जाणार लस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बहुप्रतीक्षित कोरोना लसीकरण मोहिमेला देशभरात शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. विविध ठिकाणी लसीचा पुरवठा करण्यात आला असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत लसीकरणाची ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर एका दिवसात 100 जणांना लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

हिंगाेली : सहा हजार ६५० डोस उपलब्ध
हिंगोली शासकीय रुग्णालय, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय व डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हे लसीकरण होणार आहे. सहा हजार ६५० डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ६,२०० वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.

परभणी : एका केंद्रावर असतील पाच कर्मचारी
परभणीतील केंद्राला लसीचे ९ हजार ३३० डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात तीन केंद्रांवर लसीकरण होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, परभणी शहरातील जायकवाडी परिसरातील मनपाचे नागरी आरोग्य केंद्र तसेच सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय ही तीन केंद्रे असणार आहेत. लसीकरणाच्या वेळी एका केंद्रावर पाच कर्मचारी राहणार आहेत.

बीड : एकूण ५०० कर्मचाऱ्यांना लस
लसीकरणासाठी एकूण पाच केंद्रांची निवड केली गेली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाईल. म्हणजेच पहिल्या दिवशी पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात एकूण १४ हजार ६०९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटा कोविन सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केला गेला असून जिल्ह्यासाठी १७ हजार ६४० डाेस उपलब्ध झाले आहेत, असे जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी सांगितले.

जालना : ४०० लोकांना पाठवला आहे संदेश
जिल्ह्यासाठी १४ हजार २२० लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. लसीकरणासाठी १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा तयार आहे. २ आणि ८ जानेवारी रोजी ड्राय रन घेण्यात आला. १६ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, ग्रामीण रुग्णालय भोकरदन आणि परतूर येथे लस दिली जाईल. ज्यांना लस दिली जाणार आहे, त्या सर्व ४०० लोकांना संदेश पाठवण्यात आला आहे.

नांदेड : १७ हजार ९९ कर्मचाऱ्यांना लस
जिल्ह्यात १७ हजार ३३० आरोग्य कर्मचारी-अधिकाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात विष्णुपुरी येथील मेडिकल कॉलेज, जिल्हा सामान्य रुग्णालय, हदगाव उपजिल्हा रुग्णालय, मनपा हैदरबाग रुग्णालय, मुगट (ता.मुदखेड) प्राथमिक आरोग्य केंद्र या पाच केंद्रांवर लसीकरण होणार आहे. मुगट केंद्रातून इंटरनेटवर लसीकरणाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात नियोजन झाले पूर्ण
जिल्ह्यात १० हजार ५० लसी प्राप्त झाल्या आहेत. एकूण तीन केंद्रांवर लसीकरण होईल, तर कोविन अॅपवर ९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. दररोज एका केंद्रावर १०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.