आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली जिल्हयात धुमाकुळ घातलेल्या कोविड लसची प्रतिक्षा संपली असून बुधवारी ता. १३ रात्री सात वाजता पोलिस बंदोबस्तात व्हॅक्सीनेशन व्हॅन हिंगोलीत दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात ६२०० जणांना लस दिली जाणार आहे. हिंगोली, कळमनुरी व डोंगरकडा येथे तीन ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे.
हिंगोली जिल्हयात आता पर्यंत कोविडचे ३८०८ रुग्ण अाढळून आले असून त्यापैकी ३४८३ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात ७० कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहे.
दरम्यान, कोविड लस उपलब्ध झाल्यानंतर हिंगोली जिल्हयात लसीकरण कधी केले जाणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. शासनाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. गोपाल कदम यांच्या उपस्थितीत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये पहिल्या टप्पयात वैद्यकिय अधिकारी, खाजगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, परिचारीका, आशा कर्मचारी तसेच अंगणवाडी कर्मचारी अशा ६२०० जणांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना लसीकरण केले जाणार आहे.
त्यासाठी बुधवारी ता. १३ औरंगाबाद येथून व्हॅक्सीनेशन व्हॅनद्वारे ६६५० लस पोलिस बंदोबस्तात हिंगोलीत पोहोचली आहे. हिंगोलीत आईस लाईन रेफ्रीजरेटर मध्ये लस साठविण्यात आली आहे. शनिवारी ता. १६ सकाळी ९ वाजल्या पासून हिंगोली शासकिय रुग्णालय, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय व डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जाणार आहे. या संदर्भातील संदेश संबंधितांच्या भ्रमणध्वनीवर पाठविले जाणार आहेत. त्यानंतर लसीकरण केंद्रावर त्यांची ओळख पटवून लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सर्व विभागांना समन्वय ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.