आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येत्या काही आठवड्यांमध्ये कोरोनावरील लस येण्याची शक्यता असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून यासंदर्भात सूक्ष्म नियोजनही केले जात आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता आहे. जालन्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ होऊ नये यासाठी कोविन सॉफ्टवेअरमध्ये नाव नोंदणी करून घेतली जात आहे. पुढे याच सॉफ्टवेअरद्वारे मोबाइलवर मेसेज पाठवून संबंधित व्यक्तीला त्या-त्या लसीकरण केंद्रावर बोलावले जाईल व तेथे नाव नोंदणीची खात्री करून मगच लस देण्यात येणार आहे.
जालन्यात याबाबत साेमवारी जिल्हा कृती दलाची पहिली बैठक झाली आणि याबाबतची रूपरेषा आखली जात आहे. जालन्याप्रमाणे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही नियोजनाला वेग आला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा....
जालना : कंपन्यांच्या शीतगृहांचा होणार वापर
कोविन सॉफ्टवेअर तयार केले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील लाेकांना लस दिली जाईल. शासकीय व खासगी आरोग्य संस्थांमधील दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी झाली आहे. लस ठेवण्यासाठी शीतसाखळी तयार करण्यात येणार आहे. शासकीय-खासगी आरोग्य संस्थांसह कंपन्या, प्रक्रिया उद्योगातील शीतगृहेही वापरली जातील.
हिंगोली : लस वाहतुकीसाठी २४ रुग्णवाहिका सज्ज
जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना. आरोग्य कर्मचारी व खासगी डॉक्टर अशा सुमारे ६ हजार जणांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी लस कुठून वाहतूक करावी याबाबत स्पष्ट मार्गदर्शन नसले तरी हिंगोली जिल्ह्यास कोविड लस वाहतूक करण्यासाठी २४ रुग्णवाहिका सज्ज असून लस ठेवण्यासाठी डिफ्रीझरची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
बीड : दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी
जिल्ह्यात १० हजार आरोग्य कर्मचारी-अधिकाऱ्यांना लसीकरणाचा पहिला मान मिळणार आहे. सध्या डेटा अपलोडिंगचे काम सुरू आहे. सर्व आरोग्य केंद्रात लस ठेवण्यासाठीच्या शीतगृहांची व्यवस्था केली आहे. कृती समितीची पहिली बैठक बुधवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले.
परभणी : पाच हजारांवर अधिकारी-कर्मचारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी ५ हजार ५७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियोजन केलेे आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, एएनएम, एमपीडब्ल्यू, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करणारे कर्मचारी अशा शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली आहे.
नांदेड : लसीकरणाच्या नियोजनाबद्दल बैठक नांदेडमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली येत्या ९ डिसेंबर रोजी कृती समितीची बैठक होणार आहे. यात लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद : ५७ शीत साखळी केंद्रात प्रशिक्षण
जिल्ह्यातील ५७ शीत साखळी केंद्रात प्रत्येकी २ कर्मचाऱ्यांना लस हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेे आहे. आयएलआर व डिफ्रीझर, अशा दोन्ही प्रकारच्या लसींची साठवणूक करण्याची व लस हाताळण्याची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल, असे लसीकरण अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.