आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी तिसऱ्या लाटेची:लहान मुले, प्रसूतीसाठी स्वतंत्र वॉर्ड; लसीकरणाचा वेग वाढणार; गरवारे स्टेडियमवर होणार ऑक्सिजनसह कोविड सेंटर, ग्रामीण भागावरही विशेष लक्ष

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • पहिल्या लाटेनंतर आयसीयू बेड ४१२ वरून ८३०, तर ऑक्सिजन बेड १७५९ वरून ३१०४ पर्यंत वाढले
  • आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले; ३०% बेड वाढ, कायमस्वरूपी कर्मचारी नेमा

प्रवीण ब्रह्मपूरकर /हरेंद्र केंदाळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार उडवला. त्यात तिसरी लाट येणार. त्यात तरुण आणि लहान मुलांना अधिक धोका आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यासाठी कोणती तयारी औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहे आणि आणखी नेमके काय करावे लागणार आहे, याची माहिती ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने घेतली. तेव्हा लहान मुले, प्रसूतीसाठी स्वतंत्र वॉर्ड उभे केले जाणार असून कोविड सेंटरची संख्याही वाढवली जाईल. लसीकरणाचा वेग वाढवण्यावरही भर असल्याचे समाेर अाले. आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले की, अाणखी ३० टक्के बेड वाढवावे लागतील. पण केवळ बेड वाढवून चालणार नाही तर कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार आहे.

ऑगस्ट २०२० अखेर जिल्ह्यात ११७६३ बेड होते. मे २०२१ मध्ये दुपटीने वाढून ही संख्या २०१८२ झाली. पण रुग्णसंख्या तिपटीने वाढली. ग्रामीण भागात फैलाव झाला. परंतु, तेथे आरोग्याची सुविधाच नसल्याने तेथील रुग्ण शहरात आले. आणि त्यांची दाही दिशांना भटकंती सुरूच राहिली. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा कायम राहिला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट लहान मुले, १८ ते ४० वयोगटातील तरुणांवर आघात करेल. ग्रामीणमध्ये मोठा फैलाव होईल, असेही म्हटले जात आहे. हे सर्व लक्षात घेता प्रशासनाकडून काय तयारी सुरू आहे, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधींनी केला. तेव्हा महापालिकेतर्फे ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे, लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करणे. सिडको एन-८ येथे प्रसूतीसाठी स्वतंत्र वॉर्ड, यंत्रणा उभारणीची तयारी होत असल्याचे सांगण्यात आले.

माजी नगरसेवकांच्या सूचना : व्हेंेंटिलेटर्स- बेड्स वाढवा, जादा रेमडेसिविरची खरेदी करा
मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी माजी पदाधिकारी, नगरसेवकांची गुरुवारी बैठक घेतली. त्यात तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प, बेड वाढवणे, लहान मुले, प्रसूतीसाठी स्वतंत्र वॉर्ड, कोविड सेंटर उभारणी आदींची माहिती दिली. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर, बेड्स वाढवा. रेमडेसिविरची खरेदी करा. गॅसदाहिनी सुरू करा. मेल्ट्रॉनच्या डॉ. वैशाली मुदगलकर यांना नम्रतेने बोलण्यास सांगा, अशा सूचना केल्या. माजी महापौर विकास जैन, गजानन बारवाल, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, राजू शिंदे, प्रमोद राठोड, विजय औताडे, जयश्री कुलकर्णी, भाऊसाहेब जगताप, मनोज गांगवे, गंगाधर ढगे आदींची बैठकीला उपस्थिती होती.

मनपाकडे सध्या आहेत या सुविधा

  • १७ कोविड सेंटर
  • ४००० बेड - (३००० रिक्त)
  • ४३ कोरोना तपासणी केंद्रे
  • मेल्ट्रॉन रुग्णालयात ३५२ पैकी १० आयसीयू, १२८ ऑक्सिजन बेड
  • लसीकरण केंद्र व कोविड सेंटर, तपासणी सेंटरवर ८०० डॉक्टर, लॅब टेक्निशियन, नर्स, आशा वर्कर, वॉर्ड बॉय.

एन-८ मध्ये कोविड प्रसूती केंद्र
मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, बालकांसाठी स्वतंत्र वॉर्डांचे नियोजन केले आहे. कोरोनाबाधित महिलांना प्रसूतीची अडचण येऊ शकते, म्हणून सिडको एन-८ येथे स्वतंत्र प्रसूती केंद्र सुरू केले जाईल. गरवारे स्टेडियम येथे ऑक्सिजन बेडचे सेंटर उभारले जाणार आहे.

कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीची चूक पुन्हा करू नका
तिसऱ्या लाटेत ३० टक्के बेड वाढवावे लागतील. पहिली लाट अाेसरल्यानंतर प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरी पाठवले हाेते. दुसरी लाट आल्यावर पुन्हा भरती केले. त्यात बराच वेळ गेला. ती चूक पुन्हा करू नये. कायमस्वरूपी भरती करावी. भविष्यातील कोणत्याही विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी कायम कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे आहे. डॉ. रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन मेडिकल असाेसिएशन

ग्रामीण रुग्णालये सुसज्ज केल्यास शहराचा भार कमी
तालुका, गावपातळीवर अपेक्षित साेयी नसल्याने रुग्णांना शहरात यावे लागले. वेळीच उपचार न मिळाल्याने काही जण दगावत आहेत. हे लक्षात घेता ग्रामीण रुग्णालये सुसज्ज करावी लागतील. डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन, घाटी रुग्णालय

सात महिन्यांत बेड अकरा हजारांवरून झाले २० हजार
सात सप्टेंबर २०२० रोजी औरंगाबाद जिल्ह्यात ११,७६३ तर ३ मे २०२१ रोजी २०,५९२ बेड होते. ऑगस्टअखेर रुग्णसंख्या २०,६५७ होती. मे २०२१ मध्ये ७९,१६८ झाली. त्यावेळी सप्टेंबरमध्ये सक्रिय रुग्ण ५,३६० तर ३ मे रोजी २०२१ रोजी ११,०७७ इतके होते. सप्टेंबर २०२० ते मे २०२१ या कालावधीत पॉझिटिव्हिटी दर ८.५१ वरून १३.३३% झाला. ऑक्सिजन बेड १,७५९ वरून ३,१०४ आणि आयसीयू बेड ४१२ वरून ८३० पर्यंत वाढले. व्हेंटिलेटर २२८ वरून ४६६ पर्यंत गेले. १४ मार्च २०२१ रोजी जिल्ह्यात १०२३ रुग्ण आढळले. काही दिवसांत संख्या १८०० वर गेली. या आकडेवारीच्या आधारे तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी होत आहे.

ग्रामीण डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात सर्वत्र ऑक्सिजन बेड तसेच लहान मुलांवर उपचारासाठी तयारी केली जात अाहे. तज्ज्ञांमार्फत डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाईल. जिल्ह्यात सुमारे १६ केएल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी हाेत अाहे. सध्या सुमारे ५०० व्हेंटिलेटर आहेत, ते वाढवू. अधिकाधिक लोकांना लस देण्याचा प्रयत्न आहेच.

बातम्या आणखी आहेत...