आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असाही सेवा‘भाव’:कोरोनाचे रुग्ण घाटीत, रक्तचाचण्या खासगीत! ज्युबिली पार्कजवळील ‘निदान पॅथॉलॉजी’शी साटेलोटे

औरंगाबाद / नामदेव खेडकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमिशनखोरीचा व्हायरस पसरतोय तरीही 15 लाख औरंगाबादकर शांतच

कोरोनाकाळात गोरगरिबांना लुटण्याचा धंदा फक्त खासगी रुग्णालयांनीच केला, असे नाही. घाटी रुग्णालयातही लुबाडणूक सुरू आहे. ज्या रक्तचाचण्या घाटीत उपलब्ध आहेत, त्या चाचण्यांसाठी घाटीतून थेट खासगी पॅथॉलॉजीमध्ये रक्ताचे नमुने रुग्णांच्या नातेवाइकांच्या संमतीशिवाय पाठवले जात आहेत. ‘सीबीसी’सारख्या अतिशय सामान्य रक्तचाचणीसाठीही खासगी पॅथॉलॉजीमध्ये पैसे मोजावे लागत आहेत. घाटीपासून जवळच असलेल्या निदान पॅथॉलॉजीमध्ये हे सर्व नमुने पाठवले जात आहेत.

शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या वडिलांना कोरोनावरील उपचारांसाठी घाटीच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकमध्ये भरती केलेले आहे. दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीला अचानक फोन आला, ‘मी निदान पॅथॉलॉजीमधून बोलत आहे. तुमच्या पेशंटच्या रक्तचाचण्यांसाठी घाटीने आमच्याकडे सॅम्पल पाठवले आहेत. तुम्ही तातडीने येऊन ५८० रुपये भरा’. ही बाब ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला समजली. प्रतिनिधीने त्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष निदान पॅथॉलॉजीमध्ये जाऊन खात्री केली.

सॅम्पल परस्पर जातात “निदान’मध्ये : रक्तचाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत सॅम्पल पाठवण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकाला कल्पना दिली पाहिजे तसेच या चाचण्या आपल्या दवाखान्यात उपलब्ध आहेत काय, याचीही माहिती घेतली पाहिजे. मात्र, असे न करता अगदी नातेवाइकांनाही न सांगता परस्पर सॅम्पल खासगी प्रयोगशाळेत पाठवून दिले जाते. शेवटी पैसे मोजण्याशिवाय नातेवाइकांकडे पर्याय राहत नाही.

घाटीचा “निदान’शी असा आहे करार : ज्या चाचण्या घाटीत उपलब्ध नाहीत, त्या इतर पॅथॉलॉजीपेक्षा कमी दरात करण्यासाठी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या स्तरावर “निदान’ पॅथॉलॉजीशी करार झालेला आहे. मात्र, या कराराच्या आडून ज्या सामान्य चाचण्या घाटीत उपलब्ध आहेत, त्यासाठी याच पॅथॉलॉजीला सॅम्पल पाठवले जाते.

चौकशी करू :
आमच्याकडे उपलब्ध असलेल्या चाचण्यांसाठी खासगी रुग्णालयात सॅम्पल पाठवणे चुकीचे आहे. आमचा स्टाफ मेडिसिन विभागाचा आहे. त्यांनी असा प्रकार का केला, हे माहीत नाही. याप्रकरणी चौकशी करू. -डॉ. सुधीर चौधरी, विशेष कार्य अधिकारी, सुपरस्पेशालिटी ब्लॉक, घाटी

अचानक ५८० रुपये भरण्याचा फोन आला
एका रुग्णाच्या मुलाने सांगितले, “माझ्या वडिलांना भरती केल्यावर मी संध्याकाळी गावी गेलो. अचानक मला ९५११६६३७७८ या क्रमांकावरून फोन आला. “तुमच्या रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल आमच्याकडे आले आहे, तपासणीसाठी ५८० रुपये येऊन भरा.’ मी गावी असल्याने रात्री मला जाता आले नाही. दुसऱ्या दिवशीही गावाहून औरंगाबादला येईपर्यंत दोन वेळा फोन आले. आल्याबरोबर मी निदान पॅथॉलॉजीमध्ये गेलो आणि पैसे भरून आलो.’ - एक नातेवाईक

सर्व चाचण्या होतात, पण सॅम्पल आले नाही
याबाबत पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी आणि जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. रेषाकिरण शेंडे म्हणाले, “सीबीसी’, “एलएफटी’, “केएफटी’ आणि “सीरम इलेक्ट्रोलाइट’ या चारही चाचण्या आमच्याकडे २४ तास उपलब्ध आहेत. पण, आमच्याकडे सॅम्पलच आले नाही तर आम्ही तपासणी कशी करणार?

२४ तास होतात सर्व तपासण्या
घाटीने निदान पॅथॉलॉजीला दिलेल्या रिक्विझिशन फॉर्ममध्ये “सीबीसी’, “एलएफटी’, “केएफटी’ आणि “सीरम इलेक्ट्रोलाइट’ या चार तपासण्या सांगितल्या होत्या. प्रत्यक्षात या तपासण्या घाटीतील पॅथॉलॉजी आणि जीवरसायनशास्त्र विभागात अगदी २४ तास उपलब्ध आहेत. तसे या दोन्ही विभागांच्या प्रमुखांनी सांगितले.

रुग्ण वाढल्यामुळे...
दुसऱ्या लाटेत अचानक रुग्ण वाढले होते. घाटीत केमिकल मशीन नव्हत्या. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करार केला. खासगी लॅब दोन तासात तपासणी करून अहवाल देत होते. त्यांनी रुग्णांकडून दरही कमी आकारले. डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता

तुम्ही फक्त पैसे भरा, रिपोर्ट आम्ही डॉक्टरांना ऑनलाइन देऊ
“दिव्य मराठी’ प्रतिनिधीने रुग्णाच्या मुलासोबत जाऊन पडताळणी केली, तेव्हा “तुम्ही फक्त पैसे भरा, आम्ही रिपोर्ट डॉक्टरांना ऑनलाइन देऊ,’ असे सांगण्यात आले. तसेच हे सॅम्पल आणि रिक्विझिशन फॉर्म घाटीच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकमधून आमच्याकडे आल्याचे या पॅथॉलॉजीमधील कर्मचाऱ्याने सांगितले.

त्याच टेस्ट, कुणाकडून चारशे तर कुणाकडून अकराशे रुपये उकळले
बहुतांश रुग्णांना “सीबीसी’, “एलएफटी’, “केएफटी’ आणि “सीरम इलेक्ट्रोलाइट’ या चार टेस्ट करायला सांगितल्या जातात. एकाच प्रकारच्या टेस्टसाठी कुणाकडून चारशे, कुणाकडून ५८० तर कुणाकडून तब्बल ११०० रुपये उकळले जात आहेत. विशेष म्हणजे याच्या पावत्यादेखील दिल्या जात नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...