आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार:अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन शाखेचे आंदोलन, रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौजे रहाटगाव येथील पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करुन अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, रहाटगाव शाखेच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर (दि.25) गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

पंतप्रधान घरकुल योजनेनुसार घरकुल वाटप करतांना प्रथम गावातील कच्च्या घरांचे सर्वेक्षण करून प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेत ठराव घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव देणे गरजेचे आहे. परंतु रहाटगाव ग्रामपंचायत कार्यालयाने असे कुठलेही सर्वेक्षण न करता मनमानी पद्धतीने घरकुल यादी तयार केल्याने गावातील गोरगरीब खऱ्या अर्थाने लाभार्थी असलेल्या कुटुंबांवर अन्याय झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी केला आहे.

वंचित कुटुंबांना न्याय द्या

यापूर्वी देखील संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदने देऊन या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ग्रामसेवकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अखेर गोरगरीब ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणी स्वतः लक्ष्य घालून गोरगरीब व वंचित कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी यावेळी केली आहे.

रस्त्यावर उतरण्याचा इशारा

प्रशासनाने प्रतिसाद न दिल्यास, गोरगरीब व वंचित कुटुंबांना योजनेपासून दुर ठेवल्यास येत्या काळात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन व ग्रामस्थांनी आंदोलन प्रसंगी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

यांनी घेतला सहभाग

या आंदोलनात अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू ढवळे, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, रहाटगाव शाखाध्यक्ष भास्कर पाचोडे सह अशोक गोरे, आप्पासाहेब पाचोडे, राहुल गंगावणे, विष्णू सोनार, अशोक शिंदे, दगडु गायकवाड यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

काय आहे पंतप्रधान घरकुल योजना?

  • प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.
  • ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.
  • योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.
बातम्या आणखी आहेत...