आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन नेशन वन ड्रग वन कॉस्ट:कॉर्पोरेट हॉस्पिटलमुळेच रुग्णांवर खर्चाचा बोजा ; डॉ. मंगेश पाटे यांचे परखड मत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य क्षेत्रात ‘बिझनेस कॉर्पोरेट मॉडेल’चा शिरकाव झाला आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी अनेक पटीने जास्त पैसे खर्च करावे लागतात. महागड्या सुविधांच्या नावाखाली अवाजवी फी घेतली जाते. त्यामुळे रुग्णांचा डॉक्टरावर विश्वास कमी होत चालला आहे, अशी कबुली इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महाराष्ट्राचे सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात ‘वन नेशन वन ड्रग वन कॉस्ट’ लागू केल्यास आरोग्य क्षेत्रातील खर्च ५० टक्के कमी होईल व रुग्णांची लूट टळेल,’ असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

आयएमएच्या राज्य कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक रविवारी पार पडली. यात राज्याध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, सचिव डॉ. मंगेश पाटे, औरंगाबाद आयएमए अध्यक्ष डॉ. सचिन फडणीस, सचिव डॉ. उज्ज्वला दहिफळे, माजी अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. पाटे यांनी परखड मते मांडली, ती त्यांच्याच शब्दात...

मोठ्या हॉस्पिटलचा सरकार, स्थानिक संस्थांवर दबाव
{ अॅपेंडिक्सचे ऑपरेशन औरंगाबाद करा की नागपूरमध्ये खर्च समानच यावा. त्यासाठी कॉस्टिंग स्टडी करून चार्जेस ठरवा, असे आम्ही सरकारला सांगत आहोत. मात्र काही मोठी हॉस्पिटल्स तयार नाहीत. ते अशा चर्चांना डस्टबिनमध्ये टाकतात.
{ औषधींचे अनेक ब्रँड आहेत. त्यात काहींचे दर पाचशे रुपये तर काहींचे साडेचार हजारापर्यंत असतात. जर इंजेक्शन तेच, तर किमतीमध्ये तफावत कशासाठी ? वन नेशन वन ड्रग वन प्राइस असली पाहिजे. देशात कुठेही गेले तर किंमत एकच ठेवली पाहिजे.
{ औषधांच्या कंपन्याच आज किमती ठरवतात. त्याला छेद देण्यासाठी ‘वन ड्रग वन नेशन वन कॉस्ट’ हे धोरण स्वीकारले तर उपचाराचा खर्च ५० टक्क्याने कमी होऊ शकेल.
{ मोठ्या बिझनेस मॉडेलचा दबाव असल्याने सरकार असे धोरण ठरवू शकत नाही. त्यांच्यावर कारवाईही होत नाही. स्थानिक पातळीवर या हॉस्पिटलचाही स्थानिक स्वराज्य संस्थेवर दबाव आहे. ही रुग्णालये औषधे देखील बाहेरून घेऊ देत नाहीत. मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरदेखील हतबल आहेत.

हल्ल्याबाबत पोलिस गंभीर नाहीत : डॉ. पिंगळे
आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे यांनी डॉक्टरांवर सातत्याने हल्ले होत असतानाही हल्लेखोरांवर कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘अनेकदा पोलिसांनाच डॉक्टर हल्लाविरोधी या कायद्याबद्दल माहिती नसते.’ डॉ. पाटे म्हणाले, ‘९५ टक्के डॉक्टर हल्ल्याबाबत फारशी तक्रार करत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांवरच्या हल्ल्याची पोलिस दरबारी आकडेवारी फारच कमीच आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रात सात मोठे हल्ले झाले आहेत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...