आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:बनावट नोटा प्रकरणाचा गुटखा व्यापाराशी संबंध उघड, घराच्या छतावर लपविलेला 45 हजाराचा गुटखा जप्त, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत आनंदनगर भागात बनावट नोटा प्रकरणाचा अवैध गुटखा व्यापाराशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी (4 सप्टेंबर) दुपारी बनावट नोटा प्रकरणातील आरोपीच्या घराच्या छतावरून 45 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली शहरालगत आनंद नगरात बनावट नोटा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने मुख्य आरोपी संतोष सूर्यवंशी (देशमुख) यांची कसून चौकशी सुरु केली आहे. या चौकशीमध्ये त्याने बनावट नोटांसोबतच अवैध गुटख्याचा पण व्यवसाय करत असल्याचे सांगत गुटखा विकत घेण्यासाठी या बनावट नोटांचा वापर केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर त्याच्या अधिक चौकशीत गुटख्याची पोती घराच्या छतावर पाण्याच्या टाकीमागे झाकून ठेवल्याचे सांगितले.

त्यावरून पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक रामेश्‍वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक डॉ. अश्‍विनी जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार महेश बंडे, अर्जुन पडघन, रुपेश धाबे, विजय घुगे यांनी पाहणी केली असता घटनास्थळी पाण्याच्या टाकी मागे पिवळ्या फारी खाली गुटख्याचे 12 पोते असल्याचे आढळून आले. यामध्ये सुगंधित तंबाखू, मुसाफिर, राजनिवास,जाफरानी नावचा गुटखा असल्याचे स्पष्ट झाले. या गुटख्याची किंमत 45 हजार रुपये आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष सूर्यवंशी (देशमुख) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.