आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:माळहिवरा फाटा येथे चारचाकी अडवून दांम्पत्यास लुटले, हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा पाटीजवळ चोरट्यांनी रविवारी (ता. १९) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहन अडवून मालेगाव येथील दांपत्यास लुटले. जीव वाचवण्यासाठी वाहन चालक व दांम्पत्य पळून गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे इर्टिगा हे वाहन पेटवून दिले. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील शेख अल्ताफ शेख दस्तगीर हे शनिवारी (ता. १८) नांदेड येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी इर्टिगा कार घेऊन गेले होते. त्या ठिकाणी नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर रात्री एक वाजता त्यांच्या कुटूंबियांना घेऊन परत मालेगाव कडे निघाले. त्यांचे वाहन हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा पाटी जवळ आले असताना समोरून दोन दुचाकीवर आलेल्या चार चोरट्यांनी त्यांचे वाहन अडविले.  त्यानंतर चोरट्यांनी चालक साहेबराव शिंदे यांना मारहाण केली तसेच त्यांच्याजवळील ९५० रुपये काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी शेख अल्ताफ यांनाही मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम व त्यांच्या कुटुंबाकडे असलेले दागिने काढून घेतले. अचानक झालेल्या या प्रकाराने शेख अल्ताफ यांनी घाबरून कुटुंबीयांसह घटनास्थळावरून पळ काढला. तर चालक शिंदे ही पळून गेले. वाहना जवळ कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी वाहनांमध्ये शोधाशोध करून वाहन पेटवून दिले. यामध्ये संपूर्ण वाहन जळून खाक झाले.  त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

दरम्यान आज सकाळी शेख अल्ताफ यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलीस उपाधीक्षक अश्विनी जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यधुंद अवस्थेत होते चोरटे

दरम्यान दोन दुचाकी वाहनावर आलेले चार चोरटे रुपये मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. दोघे जण स्कुटीवर तर दोघेजण अन्य दुचाकी वाहनावर होते. मात्र चोरट्यांना रात्री दारू मिळाली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  हिंगोली ग्रामीण पोलिसांचे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ढाबे व बिअरबारकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. तर ग्रामीण पोलिसांची रात्रीची गस्त होती कुठे असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे.