आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाची अवमानना:वैद्यकीय शिक्षण सचिवांना कोर्टाची अवमानना नोटीस ; महाराष्ट्र परिचर्या परिषद निवडणूक यादी

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अनिल पानसरे यांनी नोटीस बजावली. याबाबत उत्तर सादर करण्याबरोबरच १५ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी अॅड. अश्विन होन यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेच्या (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल) पदाधिकाऱ्यांची निवडणूक ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली. १० डिसेंबर २०२१ ला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठवली, पण त्याने नावे नोंद केली नाहीत. त्यानंतर अनुसया नारायण सावरगावे यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केली. त्यावर १८ एप्रिल २०२२ रोजी खंडपीठाने सचिवांना दोन आठवड्यांत नावे प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले. २१ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचा आदेशही सचिवांना कळवण्यात आला. २३ मे रोजी कायदेशीर नोटीसही त्यांना बजावण्यात आली. त्यानंतरही सचिवांनी नावे प्रसिद्ध केली नाहीत. त्यामुळे अवमानना याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाने नोटीस बजावून १५ जुलै राेजी हजर राहण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात पुढे काय होते, याकडे आरोग्य विभागाशी संबंधितांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...