आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वत:चे आर्थिक स्रोत लपवून पत्नी व ५ वर्षांच्या मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी झटकणाऱ्या पतीस कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आशिष अयाचित यांनी दोषी ठरवले. तसेच मुलगी तनिष्का व पत्नी पूजा यांना अजय सोनवणे यांनी प्रत्येकी मासिक साडेसात हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश दिले. पत्नी सध्या मुलीसह माहेरी राहते. त्यांना दाव्याच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेशही देण्यात आले.
औरंगाबादच्या हनुमाननगरातील गुरुकृपा ज्वेलर्सचे अजय बाबूराव सोनवणे यांची पत्नी पूजा मुलीच्या जन्मापासून माहेरी राहते. पुन्हा संसार सुरू करण्यासाठी त्याने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते, तर पूजाने पोटगीचा दावा केला हाेता. या दोघांचा विवाह १६ मे २०१५ रोजी झाला. १२ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना मुलगी झाली. एकमेकांशी पटत नसल्याने दोघांनी परस्परविराेधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
अॅड. रमेश घोडके पाटील यांनी पत्नीची बाजू मांडली. अजयने खोटे पुरावे देत कोर्टाची फसवणूक केली. मुलीच्या जन्मापासून पतीने मुलगी, पत्नीच्या उदरनिर्वाहाची सोय केली नाही. पोटगीही दिली नाही, याकडेही लक्ष वेधले. सुप्रीम कोर्टातील भाऊराव परळीकर विरुद्ध महाराष्ट्र शासन २००६ आणि दिलीपसिंग विरुद्ध स्टेट ऑफ यूपी २००९ या निवाड्याचा आधार घेत अॅड. पाटील यांनी महिलेची बाजू मांडली. त्यानुसार न्यायालयाने पत्नीस जिवंत असेपर्यंत व मुलीस सज्ञान होईपर्यंत प्रत्येकी साडेसात हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. तसेच इतर कलमांच्या आधारे पत्नीस भरपाईसाठी दावा दाखल करण्याची मुभा न्यायालयाने दिली.
हेतू प्रामाणिक नाही...
मुलीच्या जन्मापासून पत्नी व मुलगी माहेरी राहते. पतीचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे उत्पन्न पुरेसे असताना न्यायालयात जाणीवपूर्वक कमी सांगण्यात आले. तसेच अजयने पत्नीला नांदवण्याचा जाे दावा केला आहे ताे प्रामाणिक हेतूने नसल्याचा आक्षेप पत्नीची बाजू मांडताना वकिलांनी नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.