आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचही संशयितांना न्यायालयीन कोठडी:न्यायालये, पोलिस अधिकारीही पीएफआयच्या रडारवर : एटीएस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएफआयने (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) राज्यातील न्यायव्यस्थेतील महत्त्वाच्या व्यक्तींसह वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांवर घातपाताचा कट रचला होता. तपास यंत्रणांच्या माहितीतून हे समोर आले. यात औरंगाबादेत अटक केलेल्या पाच जणांसह एकूण २१ जण एकमेकांच्या संपर्कात होते, असा दावा एटीएसने मंगळवारी केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाचही आरोपींची पोलिस कोठडी आणखी वाढवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. मात्र, न्यायालयाने ती नाकारत सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

देशविघातक कारवायांच्या संशयावरून एटीएसने औरंगाबादेतून ‘पीएफआय’ संघटनेच्या शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रा. रोजेबाग), अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. जालना), परवेज खान मुजम्मील खान (२९), नासेर साबेर शेख (३७, दोघेही रा. बायजीपुरा) यांना २२ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. सुरुवातीला दहा दिवस व नंतर २ दिवस अशी न्यायालयाने त्यांना १२ दिवसांची कोठडी दिली. मंगळवारी ही मुदत संपताच एटीएसने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्या वेळी एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सरकारी वकील विनोद काेटेचा यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. अॅड. खिजर पटेल यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडत पोलिस कोठडीला विरोध केला.

एकूण ११९ जणांवर वॉच
तपास यंत्रणा ११९ संशयितांवर लक्ष ठेवून होत्या. त्यापैकी हे पाच वगळता १४ जणांची अद्याप चौकशी बाकी आहे. प्रत्येकाची भूमिका अद्याप समोर येणे बाकी आहे. ते सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होते, असा दावा एटीएसने कोर्टात केला. विशेष म्हणजे कारवायांसाठी संशयितांनी औरंगाबादेतील ठरावीक लोकांकडून पैसे घेतले आहेत. तामिळनाडूतूनही त्यांना आर्थिक रसद मिळाली.आरोपींकडून १० मोबाइल, एक लॅपटॉप व एक हार्डडिस्क जप्त केली आहे. त्याची एक क्लोन कॉपी मुंबईतून लवकरच मिळणार असून त्यातून ऑडिओ क्लिप हाती लागल्या आहेत. त्या क्लिपची व आरोपींच्या आवाजाची पडताळणी करायची आहे. म्हणून वाढीव कोठडीची मागणी एटीएसने केली होती.

मोबाइल क्लीनिंग करणारे कोण?
पीएफआयचे न्यायव्यवस्था व पोलिस विभागातील महत्त्वाच्या व्यक्ती लक्ष्य होत्या. त्यांचा घातपात करण्याचा कट असल्याचे तपासात समोर आले आहे. शहरातील पाचही संशयितांचा या कटातला सहभाग अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. संघटनेमध्ये मोबाइल क्लीनिंग सिक्युरिटी विभागच होता. शहरात एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिक साहित्यामधील हालचाली नष्ट करण्यासाठी या संशयितांना मदत करत होती, असेही एटीएसने सांगितले.

संशयितांचा कुटुंबीयांशी संवाद
एटीएसने पाचही संशयितांना अटक केल्यानंतर दोन वेळा न्यायालयात हजर केले. त्यात पहिल्यांदा १० दिवस, तर दुसऱ्यांदा दहा दिवसांची पोलिस कोठडी मागितली. मात्र, दुसऱ्यांदा एटीएसचे कोठडीची दावे न्यायालयाने नाकारत दोन दिवसांची कोठडी सुनावली. मंगळवारीही एटीएसने अधिकची कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने नाकारली. १५ मिनिटे सुनावणी चालली. दरम्यान, सुनावणीनंतर संशयितांच्या वकिलांनी कुटुंबाशी बोलण्याची विनंती केली. एटीएसने ती मान्य केल्यावर व्हरांड्यात संशयितांनी भेटायला आलेल्या आपल्या मुलांशी काही मिनिटे संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...