आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. पॉझिटिव्ह आणि मृतांचा आकडा दररोज उच्चांक गाठत आहे. आरोग्य सुविधेचा आढावा घेऊन सूचना करण्यासाठी तज्ज्ञांचे एक पथक मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, बीड, परभणी या शहरांत दाखल झाले. त्यांनी रुग्णांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असली तरी भविष्यात मोठी वाढ गृहीत धरून नियोजन करण्याच्या सूचना पथकाने काही ठिकाणी दिल्या आहेत.
बीड : रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांची बैठक
दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. रक्षा कुंदल या सकाळी ११ वाजता बीडमध्ये दाखल झाल्या, तर दुसरे सदस्य नागपूरच्या एम्समधील साथरोगतज्ज्ञ डॉ. अरविंदसिंह कुशवाह हे शुक्रवारी दाखल हाेणार आहेत. गुरुवारी डॉ. कुंदल यांनी जिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर व एका खासगी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. गुरुवारी सकाळी ११ वाजता पथक सदस्य डॉ. कुंदल जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह त्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. कोविड वॉर्ड, आयसीयूमध्ये जाऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. त्यांना देण्यात येणारे उपचार, त्यांच्या नोंदी याबाबत चौकशी केली. स्वॅब कलेक्शन सेंटर, लसीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली. यानंतर कोविड केअर सेंटरमध्येही एक तास पाहणी केली. आॅक्सिजनच्या खाटा वाढवा, तज्ज्ञांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करा, सीसीसीमध्येही ऑक्सिजन उपलब्ध करा, भविष्यात मोठी वाढ गृहीत धरून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
जालना : जिल्ह्यात चार दिवस पथकाचा जिल्ह्यात मुक्काम
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची डॉ. महेश चंद्रा व डॉ. विनीता गुप्ता या द्विसदस्यीय पथकाने गुरुवारी जिल्ह्यात पाहणी केली, तर सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान, चार दिवस पथकाचा जिल्ह्यात मुक्काम असून शेवटच्या दिवशी उपाययोजनांमधील त्रुटी व सुधारणा ते सुचवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परभणी : दोन तज्ज्ञ शहरात झाले दाखल
पुद्दुचेरीतील सहायक प्राध्यापक डॉ. दिनेश बाबू व नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. रंजन सोळंकी हे दोनसदस्यीय पथक गुरुवारी (दि.८) सायंकाळी परभणीत दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. पथकातील सदस्यांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीची माहिती देण्यात आली. शुक्रवारी (दि.९) पथकातील सदस्य जिल्ह्यातील कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, ग्रामीण रुग्णालयांना भेटी देणार आहेत.
लातूर : सेंटरनिहाय माहिती घेतली जाणून
जिल्ह्यातील विविध कोरोना कक्षांना पथकाने भेटी दिल्या. या पथकात डॉ. तुषार नेले व डॉ. अालोककुमार साहू या दोन तज्ज्ञ डॉक्टर्सचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी पुरेसे बेड आहेत की नाही याची पाहणी पथकामार्फत केली. दररोज किती प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत याची माहीती सेंटरनिहाय घेतली. लातूर जिल्ह्यात रुग्ण वाढण्याची कारणे पथकाने तपासली. गृह विलगीकरणसंदर्भातील मोकाट फिरणाऱ्या रुग्णांवर आळा घालण्याच्या सूचना पथकाने दिल्या आहेत.
नांदेड : कोविड वॉर्डात फिरून जाणली स्थिती
पथकातील डॉ. पालनिवेल यांनी दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन कोविड वॉर्डाचा राउंड घेतला. या वेळी रुग्णांना देण्यात येणारी औषधी, उपचार पद्धती, लसीकरण, रुग्णांना कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत यासह अन्य बाबींची त्यांनी पाहणी केली आहे. दरम्यान, याचा अहवाल ते केंद्र सरकारला देणार असून त्यानंतर केंद्राकडून आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध असून रोज २० ते २२ हजार डोस दिले जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.