आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना प्रसार:कोविड कचरा हाताळणी नियम राज्यात धाब्यावर, कचरा वेचक कामगार ठरले कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव, इतर ठिकाणी कोविड कचऱ्याच्या हाताळणीत प्रचंड दोष

कोरोना प्रसारास कारणीभूत धोकादायक कोविड कचरा अन्य कचऱ्यात मिसळण्यात येत असल्याचे प्रकार राज्यात सर्वत्र घडत आहेत. यामुळे नाशिक व औरंगाबादेत प्रत्येकी १२ घंटागाडी कामगार कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सोलापूर, जळगावसह अन्य शहरांतही कोविड कचऱ्याची हाताळणी, वाहतूक, विल्हेवाट नियमांनुसार होत नसल्याचे चित्र आहे. डंपिंग ग्राउंड्सवरील महिला कामगारांना यातूनच संसर्ग होत असल्याच्या तक्रारी भारतीय कचरावेचक आघाडीकडे येत आहेत. रुग्णालयातील कोविड कचऱ्याची विल्हेवाट काही ठिकाणी नियमाप्रमाणे होत असली तरी कंटेनमेंट झोन, हॉटेलातील कोविड सेंटर, होम क्वॉरंटाइन आदी ठिकाणच्या कोविड कचऱ्याबाबत नियमांचे उल्लंघन होत आहे.

सोलापूूर : वस्त्यांमधील कचऱ्याचे वर्गीकरण नाही
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तसे येथे महिन्याला १४०० ते १५०० किलो कोविड कचरा रुग्णालये तसेच कोविड सेंटर्समध्ये जमा होऊ लागला आहे. शहरात एकूण २५ कोविड सेंटर्स आहेत. कोविड कचरा संकलनाचा खर्च संबंधित ठेकेदाराला वाढवून मिळालेला नाही. परिणामी होम क्वाॅरंटाइन रुग्णांचा कोविड कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जात नाही.

जळगाव : कंटेनमेंट झोनमधील कचऱ्याबाबत मौन
जळगाव व भुसावळमध्ये १० कोविड सेंटर्स आहेत. रोज १००० ते १२०० किलो कोविड कचरा जमा होतो. शासन दरानुसार प्रत्येक सेंटरमधील कचरा वाहतुकीसाठी १५ हजार व विघटनासाठी १०० रुपये प्रतिकिलो आकारले जात आहेत. रुग्णालयांतील कोविड कचऱ्याचे नियमानुसार संकलन, विघटन होते. कंटेनमेंट झोनबाबत मात्र कुणीच बोलत नाहीत.

कोविड कचरा नेला जातो थेट डंपिंग ग्राउंडवर
कोविड कचरा थेट डंपिंग ग्राउंडवर येत असल्याच्या तक्रारी आहेत. कचरावेचकांसाठी हे धोकादायक आहे. हा कचरा अन्य कचऱ्यात मिसळला जाता कामा नये यासाठी सोसायट्यांपासून महापालिकांपर्यंत कुठेही गांभीर्य दिसत नाही. - ज्योती म्हापसेकर, माजी निमंत्रक, भारतीय कचरावेचक आघाडी

इकडे कोरोना पॉझिटिव्ह कामगारांचे पगार कापले
कोविड कचरा घंटागाडीतील इतर कचऱ्यात मिसळल्याने कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका आहे. ठेकेदारांनी ग्लोव्हज, मास्कही पुरेसे पुरवलेले नाहीत. पीपीई किट दूरच. क्वाॅरंटाइन कामगारांच्या वेतनाची रक्कमही ठेकेदाराने कापली आहे. - महादेव खुळे, श्रमिक कामगार संघटना, नाशिक

औरंगाबाद : निष्काळजीपणे हाताळणी, १२ जणांना संसर्ग
शहरात दररोज २.५ ते ३ टन म्हणजे महिन्याला ७५ ते ९० टन जैववैद्यकीय कचरा निघतो. नियम धाब्यावर बसवून हा कचरा अन्य कचऱ्यात मिसळला जात आहे. यामुळे घाटीतील १२ कचरावेचक कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कंटेनमेंट झोन व वस्त्यांमधून कोविड कचरा थेट वेगळा ठेवला जात नाही.

नाशिक : १२ घंटागाडी कामगार पॉझिटिव्ह
नाशिक शहरात सध्या रोज ३ हजार किलो कोरोना कचरा संकलित केला जात असून त्यापैकी ७०० ते ८०० किलो कचरा होम क्वाॅरंटाइन केलेल्या रुग्णांच्या परिसरातील आहे. कोरोना कचरा संकलनासाठी फक्त दोनच स्वतंत्र गाड्या आहेत. क्वाॅरंटाइन सेंटर्स असलेले हॉटेल्स व कंटेनमेंट झोनमधील सर्व कचरा घंटागाडीत जमा केला जातो. घंटागाडी कामगारांना पीपीई किट्स नाहीत. सध्या १२ कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याची तक्रार आहे.