आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:गरजूंसाठी आणलेल्या 500 किट पालिका कर्मचाऱ्यावर दबाव टाकून परस्पर नेल्याप्रकरणीनगराध्यक्षासह 11 नगरसेवकांवर गुन्हा

कळमनुरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथे कोरोना विषाणूच्या काळात औंढा नागनाथ संस्थानने गरजूंसाठी पाठविलेले पाचशे किट पालिका कर्मचाऱ्यावर दबाव टाकून परस्पर नेल्या प्रकरणी कळमनुरीच्या नगराध्यक्षासह ११ नगरसेवकावर शुक्रवारी (ता. ७) कळमनुरी पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ संस्थानने कळमनुरी शहरात कोरोना विषाणुच्या कालावधीत लॉकडाऊन मुळे गरजूंना वाटपासाठी पाचशे किट दिले होते. यामध्ये गव्हाचे पिठ, तांदूळ, डाळ, साबण, तेल, साखर, चहापुडा आदी संसारोपयोगी साहित्याचा समावेश होता. सदर किट कळमनुरी नगर पालिकेत पोहोचल्यानंतर ता. २३ एप्रील रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून या किट नगराध्यक्षासह काही नगरसेवकांनी परस्पर नेल्या.

या बाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सविस्तर अहवाल सादर केला होता. त्यामध्ये सदर किट नेल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पालिकेने नगराध्यक्षांसह आकरा नगरसेवकांना नोटीस देऊन सदर किट तातडीने पालिका कार्यालयात जमा करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मात्र त्यानंतरही त्यांनी किट जमा केल्या नाहीत. वारंवार सुचना देऊनही किट जमा होत नसल्याने पालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी आज कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक चंद्रकांत देशमुख, आप्पाराव शिंदे, राजू संगेकर, संतोष सारडा यांच्यासह सात महिला नगरसेवकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...