आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजचा धर्म, सरकारवर संकट:प्रक्षोभक भाषणप्रकरणी औरंगाबादेत राज ठाकरेंवर गुन्हा; तरीही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यावर ठाम

औरंगाबाद/मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे महाराष्ट्रदिनी औरंगाबादेत झालेल्या बहुचर्चित सभेनंतर राज्यात राजकारण तापले आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यावरून राज यांनी मंगळवारपर्यंतची मुदत देत थेट सरकारला आव्हान दिल्यानंतर राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली. मुंबईवरून आदेश येताच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह सभेचे अर्जदार व मनसेचे पदाधिकारी राजीव जावळीकर तसेच इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. दोन दिवसांच्या खलबतांनंतर राज ठाकरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या चार कलमांतर्गत मंगळवारी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी सोळा अटींसह परवानगी दिली होती. या अटींचे उल्लंघन केल्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यावरून चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी राज यांच्या ५० मिनिटांतील भाषणांत त्यांनी केलेल्या चौदा वक्तव्यांवर आक्षेप घेत ही वक्तव्ये वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात समाजामध्ये दुही निर्माण होईल अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी भादंवि १९५१ चे कलम ३७ (१) व (३), कलम ११६, ११७ आणि कलम १५३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तत्पूर्वी मंगळवारी दुपारी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य पोलिस दलास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्पष्ट आदेश दिले. समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगून सामाजिक एकोपा टिकून राहावा म्हणून स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात आल्याचे ते म्हणाले. राज यांच्या भाषणाचा पोलिसांनी पूर्ण अभ्यास केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारचे ३७व्या कलमाचे फर्मान; राज ठाकरे हनुमान चालिसावर ठाम
महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) नुसार पोलिसांनी शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना कलम १४९ च्या नोटिसा बजावल्या. सण, विशेष दिन, आंदोलन, मोर्चांची शक्यता, वादग्रस्त विषयावरून भडका उडण्याची शक्यता वाटल्यास पोलिस आयुक्त ३७ (१),(३) चा वापर करतात.

मंगळवारी सकाळी पोलिसांची काही पथके तयार करण्यात आली.
शहरातील मनसेच्या ४५ पदाधिकाऱ्यांना कलम ३७ नुसार नोटिसा बजावण्याचे ठरले.
मुख्य पदाधिकाऱ्यांना घरी जात तर बाकीच्यांना आयुक्तालयात बोलावून नोटिसा दिल्या.

ती व्यक्ती, तो समूह कलम १३५ अन्वये कारवाईस पात्र ठरतो
सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी असे आदेश काढण्याचा अधिकार पोलिस आयुक्तांना असतो. त्या आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, समूह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अन्वये पोलिसांच्या कारवाईस पात्र ठरतो.

औरंगाबाद पोलिसांकडून गुन्हा : भाषणातील १४ वाक्यांवर आक्षेप
राज यांच्या भाषणातील १४ वाक्ये आक्षेपार्ह असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातील काही वाक्ये अशी.

१. सभेच्या वेळेला बांग सुरू करणार असतील, तर आपण आत्ताच्याआत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. २. यांना जर सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल हे मला माहीत नाही.

३. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे ४. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ती यांना एकदा दाखवावीच लागेल. ५. देशातील हिंदू बंधू-भगिनींना विनंती, चार तारखेला हनुमान चालिसा ऐकू आलाच पाहिजे.

इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्न निकाली लावण्यासाठी हातभार लावा
६. अजिबात शांत बसता कामा नये. मागचा-पुढचा काहीही विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेलेच पाहिजेत. मंदिरावरचे असले तरी उतरवले गेले पाहिजेत. पण यांचे उतरल्यानंतर. ७. सामाजिकदृष्ट्या इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्न कायम निकाली लावण्यासाठी हातभार लावा.

तरीही ट्वीट : धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल, तर आम्हीही हट्ट सोडणार नाही राज ठाकरे भोंग्यांबाबत भूमिका मांडताना ट्वीटमध्ये म्हणतात, “आम्हाला शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगली नकोत. परंतु, आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही. अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर नमाज पठण यावर पोलिसी खाक्या दाखवावा.’

हिंदूंना अटी-शर्तींच्या नावाखाली मर्यादा, मात्र मशिदींना सूट. त्यांना हनुमान चालिसा ऐकवा. सर्व नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी, पोलिस ठाण्यात निवेदने द्या भोंग्यांच्या त्रासाबाबत ‘१००’ क्रमांकावर सजग नागरिकांनी रोज पोलिसांकडे तक्रार करावी.

देशात अनेक मुस्लिम नागरिक आहेत, ज्यांना भोंग्यांचा त्रास होतो
मला पूर्ण कल्पना आहे की, देशात असे अनेक मुस्लिम नागरिक आहेत ज्यांना भोंग्यांचा त्रास होतो. पण कर्मठ धर्मगुरूंपुढे, कट्टर धर्मवाद्यांपुढे त्यांना बोलता येत नाही. देशातील माझ्या तमाम िहंदू बांधवांनी भोंग्यांविरुद्ध काम सुरू करावे. हा विषय एका दिवसात सुटणारा नाही याची मानसिक तयारी ठेवावी.

बातम्या आणखी आहेत...