आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईला गेल्यानंतर बसमधून फिरत असताना एका नवदांपत्याचा गप्पा मारतानाचा व्हिडिओ एका अज्ञाताने शूट केला. तो एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने त्याच्या यूट्यूब व फेसबुकवर अपलोड करत आक्षेपार्ह हॅशटॅग दिले.
दांपत्यापर्यंत हा व्हिडिओ पाेहोचल्यानंतर त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी महादेव झोल एंटरटेनमेंट व करमाळा फिल्म प्रॉडक्शन या चॅनलसह तो व्हिडिओ शेअर करणाऱ्या आकाश बनसाेडे नामक प्रोफाइलधारकावर पुंडलिकनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनीता (२५, नाव काल्पनिक आहे) ही पती, सासू-सासऱ्यांसह पुंडलिकनगर परिसरात राहते. तिचे पती विमा क्षेत्रात काम करतात. मेच्या पहिल्या आठवड्यात सुनीता पतीसह मुंबईला गेली हाेती. २ मे रोजी त्यांनी मुंबई बेस्टच्या बसने शहर पाहण्याचा निर्णय घेतला. दुपारी सिद्धिविनायकाचे दर्शन करून ते बसने जुहू चौपाटीकडे पोहोचले. मोठ्या आनंदात मुंबई फिरून ते घरी परतले.
दोघांचे नियमित काम सुरू झाले. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना ७ मे रोजी सुनीताच्या बहिणीने कॉल केला. तुमचा मुंबईचा बसमधील व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत असल्याचे तिने कळवले. हा प्रकार कळताच सुनीता घाबरली. तिने पतीला हा प्रकार कळवल्यानंतर पतीने घरी धाव घेतली.
सायबर पोलिसांकडे तक्रार
दाम्पत्याने हा प्रकार कळताच सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी त्यांना पुंडलिकनगर पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यावरुन सदर चॅनलधारक व तो व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात अाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे करत आहेत.
सोशल मीडियावर प्रसिद्धीचा सोस
सोशल मीडियावर जवळपास हजारोंमध्ये फॉलोअर्स असलेल्या करमाळा फिल्म प्रॉडक्शन व महादेव झोल एंटरटेनमेंटच्या इन्फ्लुएन्सरने त्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता. बसमध्ये दांपत्य फिरत असताना कुणीतरी अज्ञाताने तो चित्रित केला होता. दांपत्य केवळ गप्पा मारत होते. मात्र, स्वत:च्या पेज रिच वाढवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी इन्फ्लुएन्सरने चुकीचे हॅशटॅग, कॅप्शन टाकून तो व्हायरल केला. यामुळे सुनीता व त्यांच्या पतीला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.